प्रतिनिधी : स्वस्त दरात चाळीत रुम बनवून देण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या एका बिल्डरला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक राजेंद्रबहादूर सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. या परिसरात अनेक चाळ बिल्डरांनी जवळपास एक कोटीची फसवणूक केल्याच समोर आलं आहे.
वसई पूर्वेच्या वाघराल पाडा, राजवली येथे परप्रांतीय चाळ माफियांनी सरकारी जमिनी, आदिवीसी जमिनीवर बनवलेल्या चाळीबाबत एबीपी माझाने वेळोवेळी बातमी दाखवली होती. माञ तरीही या परिसरात चाळ माफिया कोणालाही न जुमानता चाळी बनवत होते. महत्त्वाचे म्हणजे चाळ माफिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीतील घरं ही विकत होते. माणिकपूर पोलिसांत सिध्दार्थ इंगळे यांनी चाळ माफियांनी जाहिरात पत्रक छापून स्वस्त दरात घर देतो म्हणून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन, त्यात एका आरोपीला अटक केली आहे.
या परिसरात चाळ माफियांनी जवळपास 33 ते 34 सामान्य नागरिकांची 1 कोटी 17 लाखाची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या गुन्ह्यात आणखीन सात ते आठ आरोपी असून, सध्या ते फरार असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे. वसईच्या वाघराल पाडा राजीवली येथे परप्रांतीय भूफायांनी सरकारी जमिनी, आधिवासी जमिनी, डोंगर गिळकृंत करुन, चाळी बनवल्याची बातमी एबीपी माझाने सर्वात प्रथम 2018 साली दाखवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही आपल्या भाषणात यावर आवाज उठवला होता.
जुलै 2022 रोजी येथे दरड कोसळून दोघांचा मृत्यू देखील झाला होता. तरीही त्या राजवली वाघराल पाडा येथे चाळी उभ्या राहत होत्या आणि विक्री देखील होत होती. गरीब जनतेची फसवणूक होत होती. तर पालिकेचे अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सामान्य नागरीकांनी वेळोवेळी केला होता.
अनधिकृत चाळींमध्ये झपाट्याने वाढ
वीज व पाणी सुविधा, कमी पैशात हक्काचे घर, कर्जाची सुविधा या आकर्षक मथळ्याखाल सार्वजनिक ठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींन आकर्षित होऊन सर्वसामान्य नागरिक बळी पडतात. ठाणे, टिटवाळा, कल्याण या भागात संपूर्ण डोंगर गिळकृत करून त्या ठिकाणी अनधिकृत चाळी झपाट्याने फुलविल्या जात आहेत . वेळीच या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर उर्वरित टेकड्या व अन्य जागांवरही संस्कृती उभी राहण्याची भीती आहे.