प्रतिनिधी : राज्य सरकारचे काही अधिकारी नालायक आणि भ्रष्ट आहेत, असा थेट आरोप भाजपा आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केलाय. नाईक यांनी विधानसभेतील चर्चेच्या दरम्यान हा आरोप केला. नवी मुंबईतील सरकारी भूखंड विक्रीच्या प्रकरणात नाईक चांगलेच आक्रमक झाले होते. सिडकोमध्ये बिल्डरसाठी काही शासकीय दलाल काम करतात, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्यामधील कारभारालाच नाईक यांनी लक्ष्य केले होते.
मुख्यमंत्र्यांना किंमत नाही का?
मुख्यमंत्र्यांना पाच पैशांची किंमत नाही का? असा सवाल नाईक यांनी यावेळी विचारला. राज्य सरकारमधील काहींचे हात स्वच्छ नाहीत. तुम्हाला लाज शरम वाटली पाहिजे.पालिका आयुक्ताला तुम्ही झाडू मारायचे काम सांगता का? मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना त्यांच्या शब्दाला किंमत नाही का? मुख्यमंत्र्यांना पाच पैशाची किंमत देत नाही असे अधिकाऱ्यांनी सांगावं, अशी टीका नाईक यांनी केली.
सिडको आणि सरकारमध्ये बिल्डरचे दलाल आहेत. मी गांभीर्याने बोलतो आणि मला भय नाही.जोपर्यंत निपटारा होत नाही तोवर भूखंड विक्रीला स्थगिती द्या, अशी मागणी नाईक यांनी केली. मी सर्व अधिकारी भ्रष्टाचारी आहे असं म्हणत नाही. काही अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. मी गरज असेल तर त्याचे पुरावे देईल, असंही नाईक यांनी यावेळी सांगितले.
गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सिडकोकडून महापालिकेला दिलेल्या भुखडावर त्यांचा अधिकार कायम राहणार आहे, तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांसोबत मी या विषयावर चर्चा केली आहे. जी बैठक झाली त्यानुसार कार्यवाही होईल. ही बैठक मुख्यमंत्री घेतील. 40 चौरस किलोमीटरचे भूखंड पालिकेकडंच राहतील, असं सामंत यांनी स्पष्ट केले
गणेश नाईक सर्व अधिकाऱ्यांबाबत बोलले नाहीत. ते काही अधिकाऱ्यांबाबत बोलले होते त्या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू, असं सामंत यांनी सांगितलं. तर गणेश नाईक यांनी गंभीर आरोप केलाय. सत्ताधारी आमदारच भ्रष्टाचार सुरु आहे, असं म्हणत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली