ताज्या बातम्या

“राज्याची तिजोरी जनतेचीच – शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार.” ; लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

पाचोरा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कला मला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे पाचोरा येथील जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून पाचोरा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्याची तिजोरी ही शेतकरी कष्टकरी आणि लाडक्या बहिणींची आहे हा पैसा जनतेचाच आहे आणि जनतेसाठीच खर्च करायला पाहिजे. म्हणूनच निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आयोजित प्रचार सभेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सभेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता पाटील आणि २४ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे बोलत होते. विविध जाती-धर्मातील लोकांनी एकजूट दाखवत विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास पाचोर्‍याचा कायापालट होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या २ तारखेला धनुष्यबाणाला मतदान करून सुनीता पाटील व सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.

नगरविकास, उद्योग आणि शेतकरी योजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, पाचोर्‍यात एमआयडीसीसाठी जमीन मंजूर आहे आणि आता उद्योग आणण्याची प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून, येथील युवक बेरोजगार राहणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला. “चुनावी जुमला नाही, दिलेला शब्द पाळणारे सरकार आम्ही आहोत,” असेही त्यांचे स्पष्ट वक्तव्य होते.

शिंदे यांनी त्यांच्या सरकारमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची आठवण करून दिली. मुलींसाठी उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय, मुलांच्या दस्तावेजांमध्ये आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे चार कोटी नागरिकांना थेट लाभ देणे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटींची मदत देऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत राज्यात विकासकामांना वेग आला असून, “जनतेसाठी सत्ता आणि सेवा हा आमचा हेतू आहे; सत्ता आमचा हक्क नाही, सेवा हीच आमची ओळख आहे,” असेही शिंदे म्हणाले.

भाषणाच्या शेवटी पुन्हा एकदा भावना जागवत उपमुख्यमंत्री म्हणाले की, “धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा अभिमान आहे. या चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत. 24 पैकी 24 जागा शिवसेनेच्या झोळीत गेल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.”
…..

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top