कराड वार्ताहार: (ज्ञानेश्वर शेवाळे ) सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने कराड तालुका पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. साजूर (ता. कराड) येथील सुमित युवराज साठे याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित युवराज साठे, रा. साजूर, ता. कराड, जि. सातारा याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
मात्र, वारंवार कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसत नसल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत होती. त्यामुळे त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचा पाठपुरावा पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पोलीस नाईक किरण बामणे व पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे यांनी केला. सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रस्तावाची दखल घेत सुमित युवराज साठे याला सातारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस हवालदार सचिन निकम, शशिकांत काळे, पोलीस नाईक किरण बामणे, भूषण माने, सागर शिवदास व पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे यांनी सहभाग घेतला.
कराड तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रतिबंधात्मक कारवाया सुरूच राहणार आहेत.




