सातारा(अजित जगताप) : भारत देशामध्ये २०१४ पासून शासकीय नोकऱ्या बंद होण्याच्या प्रक्रिया सुरू झाले आहेत. मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झाले आहे. ही वास्तवता आहे. दुसऱ्या बाजूला आरक्षण कमी होत असताना सर्व जाती धर्मातील लोकांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फॉर एग्रीकल्चरचे चेअरमन चंद्रकांत जगताप यांनी सातारा येथे सुशिक्षित तरुणांच्या समोर मार्गदर्शन करताना सांगितले.
सातारा शासकीय विश्रामगृहात झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीला सामाजिक कार्यकर्ते व नवउद्योजक गणेश वाघमारे, दयानंद मस्के, तुषार बोकेफोडे, प्रशांत भंडलकर, महेश काळे, विजय ओव्हाळ ,संग्राम सरगर, मयूर कांबळे आणि फुले- शाहू- आंबेडकर-लहुजी साळवे वस्ताद चळवळीतील कार्यकर्ते व उद्योजक उपस्थित होते. या वेळेला उद्योजक व माजी आमदार आदरणीय आनंदराव पाटील यांनी बैठकीच्या स्थळी येऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचेही स्वागत करण्यात आले.
श्री . जगताप यांनी पुढे सांगितले की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक चळवळी नंतर आपली चौथी पिढी उद्योजक क्षेत्रामध्ये पाऊल उचलत आहे. मुंबई शहरामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट, माथाडी, गिरणी कामगार, बेस्ट, रेल्वे व इतर शासकीय कार्यालयामध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी करत होते. ती तिसरी पिढी आता सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यावेळी त्यांना शिक्षण घेऊन नोकरी करणे एवढेच अपेक्षित होते. उद्योजकांसाठी मार्गदर्शन नव्हते. पण, आता संधी प्राप्त झालेली आहे. गुणवत्तेला महत्व आले असून उद्योजक क्षेत्रात टिकाऊ लागण्यासाठी सर्वांनी जात विरहित राहून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. हाच महत्त्वाचे धुवा युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांचा राहिलेला आहे.
यासाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्यक कुठून मिळवले पाहिजे? याचेही मार्गदर्शन मिळणार आहे. सुशिक्षित तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागत आहे. कारण, त्यांना बॅकअप मिळत नाही. स्टार्टअप योजनेतून अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही. त्यामुळे बारावी पास झाल्यानंतर अनेक तरुण व्यसनाधीन व भाईगिरी किंवा राजकीय ताकद म्हणून वापरले जात आहेत. अशावेळी जातीपुरते मर्यादित न राहता समाज म्हणून सर्वांनी सर्व जाती धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. पूर्वी पवनचक्क्याच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे. आता सोलर ऊर्जा तसेच आखाती देशांमध्ये मसाल्याचे पदार्थ व इतर निर्यातीच्या क्षेत्रामुळे खुल्या बाजारपेठेत संधी उपलब्ध झालेले आहे. आरंभ कंपनीच्या माध्यमातून उद्योजक होणाऱ्यांसाठी एक चांगले विचारपीठ निर्माण झाले.
आंबेडकरी चळवळीमध्ये मोर्चे- आंदोलन करून न्याय मिळत नाही. तुमचा आर्थिक स्तर वाढला की सर्व समाजामध्ये मान सन्मान मिळतो. याच उद्देशाने कमिटी स्थापन करून ३६ जिल्ह्यातील ३५२ तालुक्यांमध्ये उद्योजक तयार करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सातारा जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी धर्म व जात घरात ठेवून कर्तव्य संपन्न तरुणांनी बाहेर पडले पाहिजे. आपल्याकडे आर्थिक स्तर उंचावला की व्यापक दृष्टिकोनातून लोक पाहतात. असे यावेळी श्री जगताप यांनी सांगितले. या बैठकीला सातारा शहर व परिसरातील निवडक तरुण उद्योजक होण्यासाठी काही अडचणी येतात. याबाबत अनुभवी उद्योजक व मार्गदर्शक श्री चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे तरुण पिढी उद्योजक होण्यासाठी सज्ज झाली आहे. श्री जगताप हे मूळचे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथील असून त्यांनी काही काळासाठी परदेशामध्येही अनुभव घेतला आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण बैठकीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तरुण वर्ग आकर्षित झाला आहे.





