
मुंबई : ‘नाती जुळवूया, नव्या आयुष्याची सुरुवात करूया’ हा संदेश देत मराठा मंडळ, मुलुंड (मुंबई) यांच्या वतीने आयोजित १७ वा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा २०२६ रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्रात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या मेळाव्यात तब्बल १९० वधू-वर उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत सुयोग्य जोडीदार शोधताना पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. विवाह जुळविण्याबरोबरच समाजातील एकोपा वाढविणे आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे कार्यही मंडळ सातत्याने करीत आहे.
मेळाव्याचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन वधू-वर समितीने केले होते. या उपक्रमाला मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत व कार्याध्यक्ष विनय शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. समिती प्रमुख संजय परब, निमंत्रक प्रसाद कदम, सदानंद दळवी, श्रीकांत पालव तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
उत्तम नियोजन आणि आपुलकीच्या वातावरणामुळे पालक व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.




