मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी भेट घेऊन त्यांना दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे दुष्काळग्रस्त भागांमध्ये तातडीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच दुष्काळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय पात्र शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई त्वरित वितरित करावी, शेतीच्या वीजबिलात सवलत देऊन शेतीपंपांसाठी अखंडित वीजपुरवठा करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठित करून कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात तातडीने कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नसून शेतकरी कुटुंबांच्या संपूर्ण जीवनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असतो. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाचविणे, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागणी मांडण्यात आली.




