दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी; मुख्यमंत्री सहायता निधीत भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह कडून एक लाख रुपयांचे योगदान
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या सामाजिक भावनेतून भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले. यासंदर्भातील एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत अन्नदात्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याची भावना दीपक सिंह यांनी या उपक्रमातून व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध प्रयत्न करीत आहे. त्यातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेले एक लाख रुपयांचे योगदान हा शेतकरी बांधवांच्या मदतीसाठीचा छोटासा प्रयत्न असल्याचे सिंह यांनी सांगितले.
यावेळी दीपक सिंह म्हणाले, “शेतकरी हे केवळ अन्नदाते नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण व्यवस्थेचा भक्कम आधार आहेत. नैसर्गिक संकटांमुळे ते अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना सणाचा आनंद घेता येत नाही. त्यांच्या जीवनातही आशेचा प्रकाश पोहोचावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, हीच आमची भावना आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून व्यक्त झाली पाहिजे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचेल आणि त्यांच्या संकटाच्या काळात काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच, या संकटकाळात शासनासोबतच सामाजिक संस्था, युवक संघटना आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांनीही पुढाकार घेऊन शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अन्नदात्याचा सन्मान केवळ शब्दांतून नव्हे, तर संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करूनच खऱ्या अर्थाने सिद्ध होतो, हा संदेश या उपक्रमातून भाजयुमो मुंबईने दिला आहे. समाजहित, जनसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी संघटना सदैव तत्पर असल्याचेही या योगदानातून अधोरेखित झाले.




