मुंबई : समाजातील संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. ‘मिरर महाराष्ट्र’ आणि ‘गोरेगाव मिरर’चे ज्येष्ठ पत्रकार व संपादक महेश पावसकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या कन्येने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी सुपूर्द केली.
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित भेटीदरम्यान तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मदतनिधी सुपूर्द केला.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लागावा, या संवेदनशील हेतूने तिने वर्षभरात आपल्या पिगी बँकेत खाऊ आणि इतर खर्चातून जमा केलेली सर्व रक्कम या निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दहावीच्या वर्षात अभ्यास करत असतानाही तिने दाखवलेली ही सामाजिक जाणीव अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिच्या या संवेदनशीलतेचे आणि समाजसेवेच्या वृत्तीचे विशेष कौतुक केले. “कमी वयात दुष्काळग्रस्तांसाठी दाखवलेली ही आपुलकी आणि दिलेले योगदान हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तिचे वडील ज्येष्ठ पत्रकार महेश पावसकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.




