सातारा(विजय जाधव) : जलसंधारणातून दुष्काळमुक्ती आणि जलसमृद्ध गावांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशनने सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत उल्लेखनीय काम केले आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १९६ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली असून, त्यातून तब्बल ३ अब्ज ९ कोटी लिटर पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले असल्याचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.
नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आणि विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येते. जलसंधारणा साठी पोकलेन मशीन , जेसीबी मोफत उपलब्ध करून गावाने डिझेल खर्च करावा, असा प्रयत्न केले जातात. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जलसंधारणांच्या कामांना गती देण्यात येते.
जलसंधारणासह सामाजिक बांधिलकी
लोकसहभागातून काम करण्याची इच्छा असलेल्या गावाने
नाम फाऊंडेशनकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर केला की तलाव, ओढे , नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण , नाला बांधांची दुरुस्ती, सिमेंट बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि नवीन जलसंधारण कामांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय शिक्षण, आरोग्य, अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत, शेती दुरुस्ती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सहाय्य, महिला सक्षमीकरण, धान्य व शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रमही राबविण्यात आले आहेत. यासाठी सीएसआर फंड उपलब्ध करून दिला जातो.
नाम फाऊंडेशन सोबत या कामासाठी महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स, सकाळ माध्यम समूह आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर निधी आणि सहकार्यानेही जलसंधारणाची कामे करण्यात आली. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ आणि ‘जलयुक्त शिवार’ योजनांशी समन्वय साधून पाणी बचतीसाठी प्रयत्न करण्यात आले.
जलसंधारण, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालत नाम फाउंडेशनने सातारा जिल्ह्यात उभारलेली ही मोहीम ग्रामीण भागाच्या जलसुरक्षेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोयना धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचचा शुभारंभ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदरणीय नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. ते काम यापुढे ही सुरू राहणार असल्याचे नाम फाऊंडेशन पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.



