मेढा(अजित जगताप) : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. त्याला आता जावळीकर म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ लाभत आहे. याबाबत नुकताच स्नेह मेळावा झाला. पण, जावळीच्या सर्वांगीण विकासाची चर्चा होत असताना मेढ्यातील दोन राजकीय गटात मोर्चा- प्रति मोर्चा बाबत मौन धारण केल्याने तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.
सहसचिव आर. के. धनावडे यांच्या संकल्पनेतून सायघर येथे दिवाळी स्नेहमेळावा झाला . सर्व समावेशक असे निमंत्रण नसल्याने अनेकांना मनस्वी इच्छा असतानाही उपस्थित राहता आले नाही. अन्यथा या कार्यक्रमाबाबत व्यापक स्वरूपात चर्चा झाली असती. असा आता सूर उमटला आहे. काहींनी जाहीरपणे खंत व्यक्त केली. जावळीकर म्हणून हा आग्रह आहे . असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
जावळी खोऱ्यातील वाडी-वस्तीवरील शैक्षणिक गुणवत्ते सोबतच सध्या गाव पातळीवर अनेक अनाधिकृत धंदे व वाढती बेरोजगारी चिंतेचा विषय बनली आहे. गटातटाच्या राजकारणामुळे गावचं गाव पण हरवून गेले आहे. एक गाव एक गणपती संकल्पना राबवून दशक झाले. तरीही आज वेगवेगळ्या सार्वजनिक उत्सव भरवले जात आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिबिर ऐवजी अनेक ठिकाणी दहीहंडी, गरबा डान्स, खेळाच्या स्पर्धा घेऊन त्याला विविध चषकाची नावे दिली जातात. एवढेच नव्हे तर त्याची पुढची आवृत्ती म्हणून आता राजकीय कलंगी तुरा रंगलेला आहे. बॅनरबाजी पोस्टरबाजीने वॉचे सौंदर्य लपत आहे.
जावळी तालुक्यातील काही वारकऱ्यांच्या वेषातील अधिकारी वर्गाच्या सोबत राहून ठेकेदारीतून उकळ पांढरे करून घेत आहेत. दुसऱ्या बाजूला कार्यकर्तेच आव्हान- प्रति आव्हान देत आहेत. याला खतपाणी घालणाऱ्यांना बिदागी मिळत असल्याने जावळी तालुक्याच्या राजकारणाची सदैव चर्चा होते.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी मध्ये आलेवाडी, हातगेघर, आनेवाडी, आखाडे या गावात तर प्रत्यक्षात राडा पाहण्यास मिळाला. हुमगाव मध्ये माजी मंत्र्यांच्या दारात आंदोलन झाले. याबाबत त्यावेळी नैतिक जबाबदारी म्हणून आयोजकांनी पुढाकार घेऊन जावळीकर म्हणून व्यक्त झाले पाहिजे होते. जावळीकर म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लोकांनी ऐकले असते. पण आता वेळ निघून गेलेली आहे.
जावळीकर राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे. त्यांना मनापासून अनेकांच्या शुभेच्छा आहेत. मंत्रालयातील सहसचिव आर. के. धनावडे यांच्या संकल्पनेतून सायघर येथील दिवाळी फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन ठराविक लोकांसाठी केले असले तरी ते विकासाच्या दृष्टीने दमदार पाऊल ठरले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह सुमारे ३५ राजपत्रित अधिकारी यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये जावळीतील उद्योजक सुद्धा अशा गोष्टींसाठी उपयुक्त ठरणार आहेत. जावळीमध्ये नैसर्गिक साधन सामग्री असल्याने पर्यटनाला खूप मोठी वाव आहे. सुसज्ज रस्ते आणि शासकीय योजनेतून राबवण्यात आलेल्या विविध विकास कामातूनच ते शक्य होणार आहे. यासाठी स्थानिकांचा सहभाग अधोरेखित होत आहे. जावळी तालुक्याच्या विकासासाठी कितीही चर्चा झाली? एकमेकांचा कौतुक सोहळा झाला. तरीही खेड्यापाड्यातील स्थानिकांच्या सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातूनच भावी पिढीला प्रेरणादायक असे पाऊल टाकता येणार आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीच्या वाढत्या चिंतेमुळे अनेक जण ठेकेदारी करून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी त्यांना अनुभवाची गरज आहे. हा अनुभव देण्याची क्षमता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निश्चितच आहे. या दृष्टीने आता अभियांत्रिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या जावळी तालुक्यातील अनेकांना सहभागी करून घेणे क्रमप्राप्त आहे. जावळीचा विकास करण्यासाठी जावळी तालुक्यात जे अधिकारी वर्ग येतात. त्यामध्ये काही पद रिक्त आहेत. ते तातडीने भरण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न होणे. हे अधिकाऱ्यांचे हातात आहे. त्या दृष्टीने सकारात्मक सहभागाची अपेक्षा आहे.
लहानपणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मैदानावर खेळताना आईचा रुमाल हरवला. तो मला सापडला. असा एक खेळ होता. त्याला सामुदायिक झालर होती. काल्पनिक आईचा रुमाल सापडल्यानंतर खूप मजा वाटत होती. परंतु, हरवलेला विकासाचा रुमाल शोधण्यासाठी झालेला हा स्नेह मेळावा सामुदायिक नव्हता. असेच म्हणावे लागेल. अर्थात प्रत्येकांना व्यक्ती स्वतंत्र आहे. ते मान्य करून पुढे व्यापक प्रमाणात विकासासाठी प्रयत्न होत आहे. याचे स्वागतच केले जात आहे. ही सगळी बाब सकारात्मक समजून घ्यावी.
सर्वांचा सहभाग व सर्वांच्या गुणवत्तेचा योग्य वापर करता येईल. असे काही शेतकरी ,लघु उद्योजक व निपक्षपातीपणे काम करणाऱ्या पत्रकारांनी ही आपल्या भावना यानिमित्त व्यक्त केले आहेत. शेवटी ज्या काही गोष्टी करायचे असतात. त्याची चर्चा होत नाही. तर प्रत्यक्षात कृती करावी लागते. अशी या निमित्त अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जावळीतील अनेक अधिकारी आज राज्याच्या विविध भागांत जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. आपल्या मातीशी नाते जपत आहेत. ही सुखद बाब आहे. त्याचे कौतुकच केले पाहिजे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
ओमकार पवार यांनी ग्रामविकास आणि कृषी विभागांच्या माध्यमातून गावांच्या विकासाला चालना कशी देता येईल, तसेच पर्यटनाच्या संधींचा स्थानिकांना कसा लाभ मिळवून देता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. आता प्रत्यक्ष कृती करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिकांनीही पाठपुरावा करणे हिताचे आहे.
निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी जावळीतील जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, बँकिंग आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रांत आपला ठसा उमटविल्याचे नमूद केले. आदरणीय राजेंद्र मोकाशी यांनी जावळी तालुक्यामध्ये मेढा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणाने पार पाडली होती. सध्या जावळीतील कायदा व सुव्यवस्था घसरत चाललेला आहे. हे कुणीही कबूल जरी केलं नसलं तरी प्रत्यक्षा परिस्थिती तशीच आहे. याचा आढावाही घेण्यात आलेला आहे. याबाबतही भविष्यात चर्चा व्हावी. अशी अपेक्षा आहे
शेतीचे आधुनिकीकरण आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून गावातच उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यावर विशाल घोडके यांनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. रोजगारासाठी कुटुंबे शहरांकडे स्थलांतरित झाल्याने काही गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर परिणाम झाला आहे. हे खरे असले तरी इंटरनेट सेवेमुळे जग जवळ आले आहे. पण, माणसं दुरावत चाललेली आहेत. हे सर्वत्र चालले आहे. याला फक्त जावळी तालुका अपवाद नाही.
यावेळी शासकीय वरिष्ठ अधिकारी शीतल करंजेकर तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनीही मनोगत व्यक्त केले. महिला अधिकाऱ्यांचा सहभाग हा महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी जावळी तालुक्यातील शैलेश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव, योगेश करंजेकर, शीतल करंजेकर, सुजित जाधव, वैभव गोळे, सत्यम धनावडे, अनिल महामुलकर यांच्यासह जावळी तालुका व परिसरातील अधिकारी उपस्थित होते. जावळीच्या विकासासाठी धडपडणारे पत्रकार व निवेदक मोहन जगताप यांच्याकडून हा कार्यक्रम झाल्याची माहिती मिळाली आहे. जावळीच्या मातीशी नाळ जोडल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत. जावळीतील अनेक अधिकाऱ्यांना अशा कार्यक्रमांमध्ये येऊन जावळीची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. त्याबाबत भविष्यात दमदार पाऊल टाकले जाईल अशी आशा आहे. यानिमित्त विशाल रेळेकर यांच्या स्वरसंगम हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम झाला . यानिमित्त व्यापक स्वरूप देण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक व लोकप्रतिनिधी सुद्धा प्रयत्नशील राहतील. असा विश्वास जावळीतील विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्या लोकांनी केला आहे. याची नोंद घ्यावी. तुर्त एवढेच.




