ताज्या बातम्या

मढ आयलंडमधील कॉलेज नाईट पार्टीत तरुणीवर अत्याचाराचा आरोप; मुख्य आरोपी छत्तीसगडमधून जेरबंद

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मढ आयलंड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या नाईट पार्टीदरम्यान एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तरुणीच्या पेयामध्ये गुंगी आणणारा पदार्थ मिसळून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला जुहू पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली असून, या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने २९ ऑक्टोबर रोजी मढ आयलंड परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नाईट पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत संबंधित तरुणीदेखील सहभागी झाली होती. यावेळी आरोपीने तिच्या पेयामध्ये नशेचा पदार्थ मिसळल्याचा आरोप आहे. पेय घेतल्यानंतर तरुणीला गुंगी येऊ लागली आणि ती शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत गेली. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस

घडलेल्या प्रकारानंतर तरुणीने आपल्या पालकांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तिला सोबत घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. घटना मढ आयलंड परिसरात घडल्याने सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली. पुढील तपासासाठी हे प्रकरण जुहू पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.

छत्तीसगडमध्ये शोधमोहीम; मुख्य आरोपीला अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी मुंबईतून फरार झाला होता. तो छत्तीसगडमधील आपल्या मूळ गावी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तांत्रिक तपास आणि सर्व्हेलन्सच्या मदतीने जुहू पोलिसांच्या पथकाने छत्तीसगडमध्ये कारवाई करत त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील एफआयआरमध्ये आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे. मात्र, या व्यक्तीचा कथित अत्याचाराच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत असून, पार्टीदरम्यान नेमके काय घडले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Scroll to Top