ताज्या बातम्या

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईला देशातील प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहर पुरस्कार

नवी दिल्ली : देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत नवी मुंबईने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नवी मुंबईला देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे. या उल्लेखनीय यशामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिल्ली येथे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विविध शहरांना स्वच्छतेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहराच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.

‘स्वच्छतेची नवी पहल – बढायें हाथ, करें सफाई साथ’ या संकल्पनेवर आधारित दहाव्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशभरातील शहरांच्या स्वच्छता व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यात आले. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिकांचा सहभाग आणि शहरातील सार्वजनिक स्वच्छता अशा विविध बाबींच्या आधारे शहरांची कामगिरी तपासण्यात आली.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत विविध गटांत पुरस्कार मिळवले आहेत. यंदा देशातील प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहर पुरस्कार मिळवून नवी मुंबईने आपल्या स्वच्छता अभियानाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

महानगरपालिकेचे अधिकारी, सफाई कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाची नियोजनबद्ध कार्यपद्धती यामुळे नवी मुंबईने देशासमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे.

नवी मुंबईचा हा राष्ट्रीय सन्मान केवळ महानगरपालिकेचा विजय नसून शहरातील प्रत्येक नागरिकाच्या स्वच्छताप्रेमाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. या यशामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top