मुंबई (शांताराम गुडेकर ) :’ दिवाळीचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचविणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव,सहकार्य, सेवाभाव आणि संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली यांच्या वतीने ‘दिवाळी फराळ बनवणे व आदिवासी बांधवांना वाटप’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या संचालिका सौ. कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाचे नियोजन प्रा.सौ.रसिका लोकरे यांनी केले.विद्यार्थिनींनी एकत्रितपणे दिवाळीचा फराळ तयार केला. त्यानंतर खडवली येथील आदिवासी पाड्यात जाऊन आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रा. शफीक शेख सर, प्रा. घरात सर, प्रा. फर्डे सर, प्रा. मधु सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमात कु. मोहिनी जाधव, कु. आफरीन शेख,कु.आरती पवार,कु.सारिका निपुर्ते,कु.ऋतुजा सोनावणे,कु.ऋतिका मोरे,कु.साक्षी जाधव, कु.प्रणिता गायकवाड, कु.एकता भस्मे,कु. सलोनी भालके,कु.लक्ष्मी भोईर,कु.साक्षी शेळके आणि कु.मनाली भालके या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
फराळाचे वाटप केल्यानंतर आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांनी व्यक्त केलेल्या समाधानाच्या भावना पाहून विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित झाला. विद्यार्थिनींनी स्वतः फराळ तयार करून त्याचे वाटप करत माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश दिला. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.या उपक्रमाचे संस्थेचे संस्थाचालक, संचालिका सौ.कविता शिकतोडे, संस्थेचे सभासद डॉ.बी.एल.जाधव, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर,उपप्राचार्य प्रा.प्रशांत तांदळे यांनी विशेष कौतुक केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
‘दिवाळीचा खरा आनंद हा इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यातच असतो,’ हा माणुसकीचा संदेश जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या उपक्रमातून कृतीतून साकारला.




