ताज्या बातम्या

वनमंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला भीषण आग; धुळ्याच्या लोटाने मंत्रालय परिसर हादरला 

मुंबई : दिवाळीत उडविल्या जाणाऱ्या फटाक्यामुळे मुंबई, ठाणेसह राज्यभरात विविध ठिकाणी आगीच्या घटनांमुळे जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असताना सर्वाधिक सुरक्षित आणि सदैव बंदोबस्तात असलेल्या मंत्रालयाच्या परिसरातील एका मंत्र्याच्या बंगल्याला आग लागण्याची घटना बुधवारी दुपारी घडली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावनगड’ या शासकीय बंगल्यात आकस्मितपणे घडलेल्या या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानाच्या सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसलीतरी बंगल्यातील फर्निचर आणि सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे.
आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आभाळात पसरल्याने सभोवताली मोठा गोंधळ उडाला होता. मंत्री नाईक यावेळी बंगल्यात नव्हते. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसलेतरी बंगल्यातील एअर कंडिशनर (एसी) मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती लागल्याची शक्यता महानगरपालिका प्रशासनाने वर्तवली आहे.
मंत्रालयाच्या समोर असलेल्या ‘पावनगड’ बंगल्यातील हॉलमधील एसीमधून आगीच्या ज्वाला येऊ लागल्या काही वेळातच त्या पूर्ण हॉलवर पसरल्यानंतर तेथील कर्मचारी आरडाओरड करीत बाहेर पळाले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविल्यानंतर थोड्याच वेळात तेथे तीन बंब तातडीने दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा करीत आग इतरत्र पसरू दिली नाही. त्यांचा बाजूला मंत्री आदिती तटकरे, नितेश राणे, सचिन अहिर, दादा भुसे यांचे बंगले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या प्रमुख पक्षांची कार्यालये आहेत. अशा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परिसरामध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती.
आग आता पूर्णपणे आटोक्यात आली असून सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे नाईक यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
——-
सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न एरणीवर
राज्यातील सर्वाधिक सुरक्षित व सदैव बंदोबस्तात असलेल्या मंत्रालय परिसरात मंत्र्याच्या बंगल्याला लागलेल्या भीषण आगीमुळे येथील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा चव्हाट्यावर आली आहे. सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने या ठिकाणी विविध कारणामुळे राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांची व परिसरातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गर्दी नव्हती. रस्त्यावर वाहनाची वर्दळ नव्हती.त्यामुळे जवानांना तातडीने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाला.
कागदपत्रे, दस्तऐवज जळून खाक
आगीमध्ये मंत्रालयातील फर्निचर, अन्य समान तसेच कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये वनमंत्र्यांच्या विभागातील काही दस्तऐवजाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कोणता दस्तावेज होता? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
Scroll to Top