पुसेगाव(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यात महसुली कारभार नेहमीच चर्चेत आलेला आहे. सध्या भूषणगड व होळीचे गाव महसुली कामकाज करणाऱ्या तलाठ्याच्या मनमानी कारभाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी व ग्रामस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर याबाबत गाऱ्हाणी मांडली आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये महसुली कारभाराबाबत नेहमीच तक्रारीचा सूर आहे. याला कारणीभूत सर्वच अधिकारी व कर्मचारी निश्चितच नाहीत. परंतु, पवन तावरे सारखे तलाठी हे आर्थिक घोटाळ्याने चांगलेच तरबेज झालेले आहेत. महसुली नियमाप्रमाणे काम करण्याऐवजी आपणास शेतकरी व कष्टकरी जनतेला त्रास देण्यासाठी वेतन दिले जाते. अशी समजूत श्री पवन तावरे यांनी केल्यामुळे तलाठी म्हणजे त्रास देणारा कोलाटी वाटत आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
याबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांशी बोलून या कामकाजांमध्ये सुधारणा करावी. सध्या भूषणगड व होळीचा गाव या ठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या पवन तावरे हे नेहमीच ग्रामस्थांना विविध कागदपत्राची मागणी करून हेलपाटे मारण्यास लावतात. काही वेळेला दिलेला मूळ प्रतीचा कागद हरवल्याचे सांगून दुसरा द्या. असा फतवा काढतात. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेले आहेत. अशी माहिती देण्यात आली. तलाठ्याकडे पैसे दिल्यानंतर चार तासात नोंदी घेतल्या जातात. वसुली प्रश्न सुटतो. परंतु पैसे दिले नाही की चार महिने रखडपट्टी केली जाते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देवकर, विशाल कांबळे, महबूब पटेल, दीपक खिलारे, सोमनाथ शिंदे, प्रवीण शिंदे, सोमनाथ धोत्रे यांनी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला आहे.
शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले तसेच रहिवाशी दाखले वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याच्या पीक पाण्याचा पंचनामा वेळेत होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. महत्वाच्या नोंदीसाठी महत्त्वाचे कागदपत्र सादर करूनही ते तलाठी कार्यालयात सापडत नाहीत. अशा अनेक तक्रारी सध्या शेतकरी कर्ज प्रकरण व इतर अनेक प्रश्नांबाबत भूषण गड व होळीचे गाव ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देवकर यांनी दिली आहे.
या गंभीर तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास याबाबत न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित गडगंज संपत्ती जमवणाऱ्या तलाठ्याला कायद्याचीच काठी मारून गोरगरिबांच्या न्यायासाठी समज देण्यात येईल. असाही इशारा देण्यात आला आहे……………………………..
फोटो- भूषणगड येथील तलाठ्याच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणारे श्रीकांत देवकर व मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)




