ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जावळी बँकेच्या सभासदांमध्ये चैतन्य

कुडाळ (अजित जगताप) : राज्यातील सहकारी बँकेवर सलग दहा वर्ष संचालक म्हणून सत्ता गाजवलेल्या प्रस्थापितांना सर्वोच्च न्यायालयानेच हुकमी
चपराक दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जावळी बँकेच्या सर्वसामान्य सभासदांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अनेकांच्या मनामध्ये चैतन्य पसरले आहे. मध्यवर्ती बँक तसेच नागरी सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये आता दहा वर्षाचा संचालकांचा काळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांना संचालक म्हणून संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. देशभरातून १३६ याचिका दाखल होऊन सहा आठवड्याच्या कालावधीमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाला आपले म्हणणे सादर करायचे आहे. असे अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे. बँकिंग नियमन कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार दहा वर्षे पूर्ण झालेल्या संचालकांना पुन्हा त्या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवता येणार नाही. परंतु, बऱ्याच ठिकाणी वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे नातेवाईकांनी संचालक पदासाठी दावा ठोकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे व माजी आमदार भिकू दाजी भिलारे यांच्या प्रयत्नाने सामान्य माथाडी, हातगाडीवाले, कापड बाजार मधील कामगारांनी जावळी बँकेचे रोपट वाढवून त्याचा वटवृक्ष केला आहे. आता एखाद्याने विळखा मारावा तशा पद्धतीने काही सर्प या जावळी बँकेच्या तिजोरी भोवती फिरत आहेत. यातील काहींना आता दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांच्यासाठी वेदनादायक असाच ठरला आहे. त्यांना आता सुखाने झोप घेता येणार नाही. बँकिंग क्षेत्रातील सहकारी तत्त्वाच्या नियमावलीमुळे त्यांना सुद्धा आता घरातील नातेवाईकांना जावळी बँकेचे संचालक होण्यासाठी तळजोडीचे राजकारण करावे लागत आहे. यातील काही जणांची क्षमता खूप मोठी आहे. परंतु कायदा व नियमाला कोणीही अपवाद नसते.
. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे,संचालक संतोष कळंबे व चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर या चार संचालकांचा बँकेतील दहा वर्षाचा संचालक पदाचा काळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे नवीन नियमाप्रमाणे त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता वारस नोंदीप्रमाणे बँकेच्या आगामी निवडणुकीत अर्ज भरू शकतात. इतरांच्या गुणवत्त्याचाही याबाबत विचार व्हावा अशी मागणी आता जावळी बँकेचे सभासदच करू लागलेले आहेत. शेवटी सहकार व लोकशाहीमध्ये सर्वगुणसंपन्न संधी मिळते असं प्रत्येक वेळी घडत नाही तर काही वेळेला चार चौघांचे हे निर्णय फायदेशीर ठरतात.

ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या संचालकांसोबतच बँकेच्या कर्तबगार अधिकारी व कर्मचारी आणि ठेवीदार, नियमित कर्ज भरणारे कर्जदार यांचाही ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे बँकेच्या प्रगतीसाठी सिंहाचा वाटा आहे.
बँकेची सध्या एकूण सभासद संख्या ५४,५७४ इतकी आहे. परंतु वार्षिक सभेला दहा ते पंधरा टक्केच लोक उपस्थित राहतात. त्यातच अनेकांना फायदा होत आहे. हे सुद्धा लपून राहिले नाही.
यंदाच्या वर्षी सभासदांसाठी आठ टक्के लाभांश जाहीर केला आहे. हा निवडणुकीपूर्वीचा जुमला वाटत आहे. अशी आतापासून चर्चा सुरू झालेली आहे.
जावळी बँकेची एकूण ठेवी१०६८.९६ कोटी
एकूण कर्ज ६७३.६२ कोटी,निव्वळ नफा१०.४० कोटी,वसूल भागभांडवल २७.४२ कोटी,राखीव व इतर निधी१२२.९२ कोटी,खेळते भांडवल१२५३.७६ कोटी आणि महत्वाचे म्हणजे बँकेचा निव्वळ एन.पी.ए. शून्य आहे आणि ऑडिटमध्ये अ वर्ग मिळाला आहे.
सध्या बँकेचा मुख्य कार्यालयासह २७ शाखांचा विस्तार आहे. बँकिंग क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या हाती बँक मोठे होताना अधिक मोठी करण्याची कमाई होऊ शकते. परंतु, राजकीय फायद्या तोट्यासाठी बँकेचे काही महाभाग हे उघडपणाने राजकारण करत असून यावर आता पायबंद घालण्याची वेळ आली आहे. दहा वर्षाची मर्यादा नियमावली ही सहकार क्षेत्रात चांगली सुरुवात आहे. पूर्वी शंभर रुपयाच्या भाग भांडवलावर निष्ठावंत संचालक झाले होते. आता बँकेच्या फायद्यासाठी विरोध केल्यास महाराज व गुरुजींच्या पॅनलला विरोध होत आहे. अशी अफवा पसरवून आपल्या भातावर डाळ ओढण्याचा प्रकार आता सभासद खपवून घेणार नाही. त्याचीही सहा महिन्याने होणाऱ्या जावळी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी आत्तापासून मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे. आगे आगे होता है क्या? हे पाहणे आता बँकेच्या सभासदांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे बँकेचे हित पाहणाऱ्या विरोधकांचाही रोल महत्त्वाचा ठरणार आहे. अशीही चर्चा सुरू झालेली आहे. …………………………….
फोटो — जावळी बँकेच्या आठवणींना उजाळा देणारे छायाचित्र… (संकलन- अजित जगताप, सायगाव)

Scroll to Top