ताज्या बातम्या

सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! १२ तासांत दरोड्याचा छडा; १ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा (नितीन गायकवाड) : वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर कुरिअर कंपनीच्या पिकअप वाहनाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या विटा लुटणाऱ्या आठ आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप वाहनाचा तीन मोटारसायकलींवरून आलेल्या आठ जणांनी पाठलाग केला. कवठे गावाजवळ वाहन अडवून चालकाला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली आणि वाहनातील दागिने व चांदीच्या विटा असलेले पोते लुटून नेले. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, भुईंज व वाठार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कुरिअर वाहनाच्या नियमित वाहतुकीची माहिती असलेल्या कर्मचाऱ्याने साथीदारांना माहिती दिल्याने दरोड्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी मालगाव येथील सात आणि शिवथर येथील एका अशा आठ आरोपींना अटक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Scroll to Top