ताज्या बातम्या

खिशाला आणखी चाट ; खाद्यपदार्थांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

मुंबई : व्यावसायिक गॅस, अन्नधान्य, भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. यातच भाडे, कर्मचारी वेतन आणि वाहतूक खर्च याचा विचार करता हॉटेल आणि रेस्टॉरंट मधील खाद्यपदार्थांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत ही दरवाढ लागू होईल, असे संकेत इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची चहा-नाश्त्यापासून जेवणाची थाळीही महागणार आहे.

व्यावसायिक एलपीजी, पाइपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या गॅसच्या किमतींमध्ये झालेली वाढ, दूध, डाळी, कांदे, खाद्यतेल, भाजीपाला व किराणाच्या वाढत्या किमतींमुळे दैनंदिन खर्च वाढला आहे. हॉटेल उपकरणांची देखभाल, वीज, इतर सुविधांचा खर्च यांमुळे दरवाढ केल्याचे आहारने म्हटले आहे.

दरवाढीमुळे इडली, डोसा, डाळ-भात यांसारख्या रोजच्या नेहमीच्या खाद्यपदार्थांच्या किमतीही सुमारे १० ते २० रुपयांनी वाढ होऊ शकते. कामानिमित्त बाहेर जेवणारे कर्मचारी, घरापासून दूर राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी, घरपोच खाद्यसेवेवर अवलंबून असलेले व्यावसायिक यांच्यासह लाखो मुंबईकरांच्या मासिक बजेटवर याचा थेट ताण पडणार आहे.

दरवाढ नफेखोरीसाठी नसून ग्राहकांना अपेक्षित अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, सेवा आणि रोजगार कायम ठेवण्यासाठी आहे. डाइन-इन, क्विक सर्व्हिस आणि घरपोच खाद्यसेवा अशा विविध प्रकारच्या सेवांमध्येही ही दरवाढ लागू होऊ शकते असे विजय के. शेट्टी, अध्यक्ष, आहार संघटना यांनी म्हटले आहे.

Scroll to Top