ताज्या बातम्या

सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दसरा मेळावा उत्साहात

मुंबई : सातारा जिल्ह्याच्या कर्तृत्ववान परंपरेचा वारसा जपत मुंबईत विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सातारकरांचा गौरव करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दसरा मेळाव्याचे आयोजन दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालयात करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष राजाराम निकम, उपाध्यक्ष बाबुराव माने, संचालक एकनाथ तांबवेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मुंबईतील विविध भागांतून निवडून आलेले सातारकर नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी आमदार बाबुराव माने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सातारा जिल्ह्याला अजिंक्यताऱ्याचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. याच भूमीतील लोक मुंबईसारख्या महानगरात विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रतिष्ठान सामाजिक कार्याला प्राधान्य देते. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी सातारकर म्हणून सर्वांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.
सातारकर युवकांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, रोजगारासाठी सहकार्य करणे आणि गरजूंना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला असताना मुंबईतील सातारकरांनी एकत्र येत तब्बल ६५ लाख रुपये उभे करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचेही माने यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

Scroll to Top