मुंबई :

मराठा समाजाचे उपनगरातील मानाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मुलुंड येथील ‘मराठा मंडळ’ या नामांकित संस्थेच्या २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी पार पडलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनल’ने विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडवत एकतर्फी ऐतिहासिक विजय संपादन केला. अध्यक्षपदासह कार्यकारिणीच्या सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवून या पॅनलने मंडळावरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत अजिंक्य पॅनलचे श्री. शिवाजी जगन्नाथ सावंत यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत तब्बल ५५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत एकूण ८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुजाण सभासदांनी संस्थेच्या विकासकामांवर व पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवत पॅनलच्या पाठीशी उभे राहण्याचा कौल दिला.
कार्यकारिणी सदस्य पदासाठी झालेल्या मतदानात (एकूण मतदान: ७७०) अजिंक्य पॅनलच्या सर्व १४ उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत निर्णायक आघाडी घेतली. यामध्ये सौ. शुभदा योगेश म्हामुणकर यांनी सर्वाधिक ५३४ मते मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर श्री. संतोष परशुराम सावंत यांनी ५२८ मते मिळवत द्वितीय क्रमांक राखला. आणि तिसऱ्या क्रमांकावर श्री विनय नारायण शेलार आणि सौ. सोनाली संतोष सावंत ह्यांना ५१९ मते मिळाली.
उर्वरीत कार्यकारिणी सदस्य
श्री. रमेश लक्ष्मणराव शिंदे, श्री दीपक सगुण राणे, श्री. सचिन भालचंद्र पाटील, श्री. रवींद्र वासुदेव सावंत, श्री. संतोष गंगाराम महाडिक, श्री. वैभव अरविंद राणे, श्री. अरुण विठ्ठल चव्हाण, श्री. दीपक धोंडीराम सावंत, श्री. मनोहर जनार्दन जुन्नरे, श्री. निलेश शंकर सुर्वे.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी आणि सभासदांनी श्री तुळजा भवानी ओटी भरली आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा देत एकच जल्लोष केला.
या विजयानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. शिवाजी सावंत यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा विजय म्हणजे संस्थेच्या प्रामाणिक कार्यावर आणि समाजहिताच्या ध्येयावर सभासदांनी मारलेली पसंतीची मोहोर आहे. हा केवळ एका पॅनलचा विजय नसून समस्त मराठा बांधवांच्या एकजुटीचा विजय आहे. मतदारांनी आमच्यावर दाखवलेला अतूट विश्वास आम्ही मंडळाच्या सर्वांगीण विकासातून आणि नवनवीन समाजोपयोगी उपक्रमांतून सार्थ ठरवू.”
या निवडणुकीत मतदान करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या सर्व सभासद आणि ज्येष्ठ मार्गदर्शनाची मंडळातर्फे आभार मानण्यात आले. सर्व विजयी उमेदवारांवर विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




