ताज्या बातम्या

दादर पश्चिमेतील अधिकृत फेरीवाल्यांना पुन्हा व्यवसायाची संधी; व्यापारी असोसिएशन व हॉकर्स संघटनेत सकारात्मक चर्चा

मुंबई : दादर पश्चिम विभागातील दुकानदार तसेच अधिकृत फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांवर दादर व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र हॉकर्स संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्यात सकारात्मक व सहकार्यपूर्ण चर्चा झाली. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या जी-उत्तर विभागातील अधिकृत फेरीवाल्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला.

न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करून तसेच कायद्याच्या चौकटीत राहून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वकिलांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ महेंद्र पंडित तसेच दादर, शिवाजी पार्क, माहीम, शाहूनगर व धारावी पोलीस ठाण्यांशी चर्चा केली.

या चर्चेनंतर महापालिकेने अधिकृत व कोडधारक फेरीवाल्यांची यादी संबंधित पोलीस विभागाला देऊन, नियम व कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना व्यवसाय करण्यास सहकार्य करण्याबाबत पत्राद्वारे सूचना दिल्याचे संघटनेने सांगितले.

या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या अधिकृत फेरीवाल्यांना दिलासा मिळाला असून, हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे, असा दावा संघटनेने केला. जी-उत्तर विभागातील आपल्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Scroll to Top