घोगाव (ता. कराड) : आई रेणुका मातेच्या कृपेने आणि ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हरवलेली बॅग अवघ्या अर्ध्या तासात तिच्या मूळ मालकाला परत मिळाल्याची घटना घोगाव येथील जोतिबा नगरमधील आई रेणुका माता मंदिरासमोर घडली.
परवा रात्री वडाप वाहनातून प्रवास करताना एका प्रवाशाची काळ्या रंगाची बॅग वाहनाच्या टपावर ठेवलेली असताना रस्त्यात पडली. रात्रीच्या अंधारात ही बॅग आई रेणुका माता मंदिरासमोर आढळून आली. रात्रभर ती बॅग मंदिराच्या दरबारासमोर सुरक्षित होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आई रेणुका मातेची पूजा केल्यानंतर बॅग तपासण्यात आली. त्यामध्ये नवीन कपडे, काही पैसे व इतर साहित्य होते. तसेच कपड्यांच्या पिशवीवर कोकरूड येथील एका कापड दुकानाचे नाव असल्याचे निदर्शनास आले. संबंधित दुकानदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा कोकण व पश्चिम महाराष्ट्र परिवहन एसटी प्रेमी समितीचे अध्यक्ष जावेद मुलाणी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून बॅगच्या मालकाचा शोध घेण्यास मदत केली. विशेष म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात बॅग हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागला. सलमान मुलाणी हे मूळचे बिळाशी येथील रहिवासी असून कामानिमित्त पुणे येथे असतात. गावी येताना वडाप वाहनाच्या टपावर ठेवलेली आपली बॅग पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नव्हते. त्यांनी मागे जाऊन शोध घेतला होता; मात्र बॅग मिळाली नव्हती.
जावेद मुलाणी यांच्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर सलमान मुलाणी यांनी बॅगेतील साहित्याची अचूक माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बॅगेतील पैसे, कपडे व इतर सर्व साहित्य सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
यावेळी अस्वलेवाडीचे शंकर खोत, तसेच समतानगर (येळापूर), ता. शिराळा येथील आई रेणुका मातेचे भक्त आकाराम कांबळे व सौ. संगीता कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या घटनेतील विशेष बाब म्हणजे बॅग रस्त्याच्या पुढे किंवा मागे न पडता थेट आई रेणुका मातेच्या मंदिरासमोरच कशी आढळली, याबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ही आई रेणुका मातेची कृपा आणि दैवी शक्तीचा चमत्कार असावा, अशी भक्तांची भावना आहे.
हरवलेली बॅग प्रामाणिकपणे जपून ठेवून ती मूळ मालकापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि जावेद मुलाणी यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




