ताज्या बातम्या

वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबरपासून खारघर टोलनाक्याजवळ आमरण उपोषणाचा इशारा! अध्यक्ष – राजेंद्र वनवे

कोकण (शांताराम गुडेकर ) : महाराष्ट्रातील वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जय भवानी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ५ डिसेंबर २०२६ पासून खारघर टोलनाक्याजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा जय भगवान ट्रान्सपोर्ट चे अध्यक्ष राजेंद्र वनवे याच्या कडून करण्यात आली आहे. जोपर्यंत वाहतूकदारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वाहतूकदारांनी शासनाकडे आठ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये परिवहन विभागाकडील आजपर्यंतचे थकीत दंड पूर्णपणे माफ करावेत, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील स्पीड लिमिट ४० वरून ६० करावे, तसेच पनवेल परिवहन कार्यालयात वाहन पासिंगच्या प्रक्रियेदरम्यान होणारी कथित आर्थिक लूट तात्काळ थांबवावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
तसेच पनवेल येथील ARYA ENERGY LIMITED ATS CENTRE येथे वाहन पासिंगदरम्यान वाहनांना जाणीवपूर्वक फेल केले जात असल्याचा व त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात आलेले थकीत दंड पूर्णपणे माफ करावेत, प्रमुख शहरांमध्ये अवजड वाहनांच्या प्रवेशाच्या वेळांबाबत पुनर्विचार करावा, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच शासनाने दंडामध्ये जाहीर केलेली २० टक्के सवलत न देता संपूर्ण थकीत दंड माफ करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ४० फूट फोर्टी टेलरच्या आरसी बुकवर वाहनाची लांबी १६ मीटर अशी नोंद करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
या सर्व मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे. जय भवानी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्व कमिटी सदस्य तसेच महाराष्ट्रातील विविध वाहतूकदार संघटना या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणामुळे वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार असून, आता शासन या मागण्यांबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वाहतूकदार वर्गाचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top