सातारा (विशेष प्रतिनिधी) : “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या उदात्त भावनेतून सातत्याने सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे कोंडवे (ता. जि. सातारा) येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जनरल कौन्सिल सदस्य श्री. दीपक जयश्री शंकरराव भुजबळ गुरुजी यांनी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षक दिना’चे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आपले ६० वे (हीरक महोत्सवी) रक्तदान पार पाडले.
या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते भुजबळ गुरुजींचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यातही तत्पर
दीपक भुजबळ गुरुजी यांनी केवळ शिक्षक संघटना आणि रक्तदानापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांत स्वतःला झोकून दिले आहे. ते आपल्या दरमहा मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून (पगारातून) काही भाग सामाजिक कार्यासाठी दान करतात. याशिवाय त्यांनी अन्नदान, ग्रंथदान, वृक्षारोपण, आणि प्लास्टिक मुक्ती यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
संपूर्ण कुटुंबाचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
भुजबळ गुरुजींच्या या सामाजिक प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. गुरुजींसह त्यांच्या पत्नी सौ. कांचन भुजबळ, मुलगा ओंकार आणि मुलगी क्रांती या सर्वांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
एकत्र कुटुंबाचे भक्कम सहकार्य
आपल्या या प्रदीर्घ सामाजिक प्रवासाबद्दल बोलताना भुजबळ गुरुजी अभिमानाने सांगतात की, “माझी आई कै.जयश्री, वडील शंकरराव आप्पा, भाऊ ललितकुमार व किरण, वहिनी सौ. सुजाता व सौ. अरुणा आणि बहीण सौ. राजश्री या संपूर्ण एकत्र कुटुंबाचा पाठींबा आणि निरंतर सहकार्य लाभल्यामुळेच मी हे सामाजिक कार्य करू शकलो आहे.”
शिक्षक दिनादिवशी ६० वे रक्तदान करून भुजबळ गुरुजींनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.




