ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेत साताऱ्यात वकिलांचीच संचालकांसाठी जुगलबंदी…

सातारा(अजित जगताप) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व स्वातंत्र्यसेनानी किसनवीर आबा साहेब यांच्या प्रेरणेने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निर्मिती झाली. याला ७६ वर्षे झाली आहेत. यंदाच्या वर्षी जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदासाठी हरकती आल्यामुळे नामांकित वकिलांची जिल्हा बँकेच्या पहिल्या मजल्यावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात जुगलबंदी पाहण्यास मिळाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर सात हरकतींवर सुनावणी सुरू झाली. दिवस मावळला तरी सुनावणी सुरूच होती. मात्र कायद्याची बाजू तपासून पाहण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांनी निकाल लावण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पत्रकारांना स्पष्ट सांगितले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजप स्वबळावर लढणार असा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीतून ही निवडणूक लढवण्याची भाषा सुरू झाली तर दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या विरोधात हरकती घेतल्यामुळे सुनावण चांगलीच गाजली.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी १७५ उमेदवारांनी २३६ अर्ज दाखल केले आहेत. छाननीदरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील तीन, वाई तालुक्यातील दोन, खंडाळा तालुक्यातील एक आणि औद्योगिक-विणकर मतदारसंघातील एक अशा सात हरकती दाखल झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्यासमोर या हरकतींवर सुनावणी झाली.

या सुनावणी मध्ये कोल्हापूरचे अँड लुई शहा आणि पुण्याचे अँड .अरुण खोत यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाशी संबंधित उमेदवारांवरील हरकतींवर बाजू मांडली. तर साताऱ्यातील सहकार क्षेत्रातील वकील एस.डी. शिंदे आणि डी.एच. पवार यांनी भाजपाशी संबंधित उमेदवारांच्या बाजूने युक्तिवाद केला.

दहा वर्षांच्या संचालकपदाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने दहा वर्षापासून जिल्हा बँकेत संचालक असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसत होती. जिल्हा बँकेत दहा वर्ष संचालक असलेले राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, प्रदीप विधाते, नितीन पाटील, सौ. कांचन साळुंखे यांच्या समवेत प्रवीण धसके संजय मोरे दिलीप बाबर राजेश पाटील सभागृहात उपस्थित होते. आपली बाजू भक्कम मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी केली होती. दिवस मावळल्यानंतर समर्थकांची गर्दी कमी झाली. परंतु सुनावणी बाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय अपेक्षित होता. उद्या सकाळी कायद्याच्या सर्व बाजू पाहूनच निकाल दिल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. काही वकील मंडळी हे जिल्हा बँकेच्या पॅनलवर काम करत आहेत. त्यांनी बँकेच्या संचालकांची ही बाजू मांडण्यासाठी मोठ्या मनाने तयारी केली. एवढेच नव्हे तर काही नामांकित वकिलांसाठी बँकेने वाहनाची व्यवस्था करून सहकार चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीही चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे.
————————————-

फोटो– सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये जिल्हा बँक संचालकांच्या उमेदवारीबाबत सुनावली सुरू असताना (छाया– अजित जगताप ,सातारा)

Scroll to Top