ताज्या बातम्या

‘शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान’तर्फे ‘शरद रत्न’ पुरस्कार जाहीर; डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज आणि हरिश्चंद्र जंगम यांचा सन्मान

मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या ‘शरद रत्न’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा आध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री ष.ब्र. १०८ सद्गुरू राष्ट्रसंत डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांची ‘शरद रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी धर्मसंरक्षण, वारकरी व कीर्तन संप्रदायाचा प्रचार-प्रसार, संत साहित्याचा प्रसार तसेच समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या बहुमोल धार्मिक व सामाजिक योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना ‘शरद रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
तसेच वैभव सहकारी पतसंस्था, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष आणि घाटकोपर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हरिश्चंद्र जंगम यांनाही सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘शरद रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दोन्ही मान्यवरांचा बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक मंत्री भरतशेठ गोगावले, तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
या पुरस्काराबद्दल शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव हरिश्चंद्र बा. जंगम यांनी डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज आणि हरिश्चंद्र जंगम यांचे अभिनंदन केले आहे.

Scroll to Top