ताज्या बातम्या

साताऱ्यात २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान ‘रचना २०२६’ भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन!

सातारा(अजित जगताप) : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने साताऱ्यातील पोलीस कवायत मैदानावर बांधकाम क्षेत्रातील भव्य ‘रचना २०२६’ वास्तू प्रदर्शनाचे आयोजन २६ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुमारे १०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, चार दिवसांत तीन लाखांहून अधिक नागरिक भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक स्कॉन इन्फ्रा प्रेस्टेस एलएलपी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कंग्राळकर असोसिएट्स आहेत. तर उत्थान एलिव्हेटर्स, नवनीर्मिती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. यांचे सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभणार आहे.

प्रदर्शनाची माहिती देताना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे यांनी सांगितले की, हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. मात्र, प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor या लिंकवरून नोंदणी करता येणार आहे.

असोसिएशनचे सेक्रेटरी नीलेश शिंदे यांनी सांगितले की, ‘रचना २०२६’ हे प्रदर्शन केवळ घरांची खरेदी-विक्री करण्याचे व्यासपीठ नसून, घर बांधणीपासून अंतर्गत सजावटीपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे परिपूर्ण व्यासपीठ आहे. यामध्ये इंटेरिअर डिझाइन, बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डनिंग आणि घराच्या सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक असलेल्या विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश असेल.

या प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहप्रकल्प, किचन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीज, आधुनिक बांधकाम साहित्य, स्विमिंग पूल, गार्डनिंग आणि फिटनेस इक्विपमेंट्स यांसह विविध उत्पादने व सेवांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, कारागीर तसेच घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातील नवीन संकल्पनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत विशेष बैठक आणि पुस्तिकेचे प्रकाशन

दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्यागी यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान ‘रंग साताऱ्याचा’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याची माहिती सातारा सेंटरचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे यांनी दिली.

‘रचना २०२६’ हे प्रदर्शन ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर दरवर्षी आयोजित केले जाते. स्वतःची व्यावसायिक कामे बाजूला ठेवून असोसिएशनचे सर्व सभासद या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेत असतात. या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच मोठ्या आर्थिक उलाढालीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी ९७६७०००६७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.baisatara.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी असोसिएशनचे माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर रामदास जगताप, संतोषकुमार जगताप आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Scroll to Top