कराड : ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, कराड तालुका, जिल्हा सातारा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कराडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये ३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून २४ महिन्यांचे थकीत मानधन जमा करणे, यापुढे मानधन नियमित देणे, प्रवास भत्ता व विमा संरक्षण देणे यांचा समावेश आहे. तसेच ग्रामसभेच्या निर्णयावरून थेट सेवा समाप्तीची पद्धत बंद करावी, ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून कार्यरत करावे, ‘एक ग्रामपंचायत–एक ग्रामरोजगार सहाय्यक’ ही संकल्पना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
ऑनलाइन कामकाजासाठी संगणक, इंटरनेट व आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी अध्यक्ष सोमनाथ थोरात, उपाध्यक्ष प्रताप भणगे, सचिव सुधीर दीक्षित, खजिनदार रामचंद्र शेवाळे, मार्गदर्शक जयवंत माने, संघटक सुरेश शेवाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कराड तालुक्यातील बहुसंख्य ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.




