ताज्या बातम्या

महात्मा गांधी जयंतीनिमित्त वाई बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान – किसनवीर महाविद्यालय व वाई आगाराचा संयुक्त उपक्रम; प्रवाशांकडून कौतुक

वाई (नितीन गायकवाड) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त किसनवीर महाविद्यालय, वाई आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाई आगाराच्या वतीने संयुक्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाई आगाराच्या आगारप्रमुख रेशमा गाडेकर, स्थानक प्रमुख राहुल शिंगाडे, वाहन निरीक्षक अजय जाधव, वाहन नियंत्रक अविनाश राजपुरे, जितेंद्र खैरे, साधना शिनगारे तसेच चालक व वाहक उपस्थित होते.
किसनवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, NSS विभागाचे सल्लागार डॉ. आनंद घोरपडे, कार्यक्रमाधिकारी डॉ. भीमाशंकर बिराजदार, स्वयंसेवक प्रतिनिधी समर्थ नागुरे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वाई बसस्थानक परिसराची स्वच्छता केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणि स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे वाई बसस्थानकातील प्रवाशांनी कौतुक केले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा हा उपक्रम ठरला.

Scroll to Top