ताज्या बातम्या

कालचक्रात अडकवणाऱ्या ‘अनादी 10:10’ नाटकाचा प्रयोग संपन्न आचार्य अत्रे रंगमंदिरात नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण (एस. एल. गुडेकर ) : ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ग्रामीण कला मंच प्रस्तुत ‘अनादी 10:10’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात उत्साहात पार पडला. काळाच्या अनाकलनीय चक्रात अडकलेल्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची रहस्यमय कथा मांडणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
लेखक, निर्माता व दिग्दर्शक उमेश मारुती भेरे यांनी वेगळ्या विषयाची मांडणी करत रहस्य, भीती, विनोद आणि भावनिक प्रसंगांची सुरेख गुंफण साधली. प्रभावी संवाद, दमदार अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत यामुळे नाटकातील उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहिली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले.नाटकाची प्रकाशयोजना विराज देसाई व चैतन्य पाणवळकर, रंगमंच सजावट संतोष जाधव व मैथिली उमेश भेरे, वेशभूषा मैथिली उमेश भेरे, रंगभूषा सोहम कोचरेकर आणि नृत्य दिग्दर्शन ऐश्वर्या विशे यांनी केले.नाटकात नितीन गाडेकर, महेंद्र जाधव, ऐश्वर्या विशे, सुशील शिरसाठ, अरुण चौधरी, दिप्ती वाकचौरे, प्रसाद वैद्य, धनेश पाटोळे, अविनाश दलाल, केशव भागाडे, किमया वेखंडे आणि प्रीतम हजारे यांनी भूमिका साकारल्या.ग्रामीण कला मंचच्या या नाट्यप्रयोगाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कलाकारांच्या मेहनतीची आणि दर्जेदार नाट्यनिर्मितीच्या प्रयत्नांची पावती ठरला.

Scroll to Top