ताज्या बातम्या

लोकनिर्माणच्या दिवाळी अंकाचे मुख्य कार्यालयात उत्साहात प्रकाशन!

मुंबई/शांताराम गुडेकर) : लोकनिर्माण वृत्तपत्राच्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन कोणत्याही प्रमुख पाहुण्याला आमंत्रित न करता संपादक बाळकृष्ण कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृत्तपत्राच्या प्रतिनिधींच्या हस्ते चिपळूण येथील मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. प्रतिनिधींच्या सहभागातून प्रकाशन सोहळा आयोजित करून लोकनिर्माणने आपल्या परिवारातील सदस्यांनाच विशेष महत्त्व दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी उपस्थित प्रतिनिधींचे पेन देऊन स्वागत केले. त्यानंतर ‘तिसरं महायुद्ध?’ या विषयावरील दिवाळी विशेषांकासह वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवरुखच्या नवनियुक्त प्रतिनिधी वैदेही सावंत यांना संपादक बाळकृष्ण कासार यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
लोकनिर्माण वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी जागतिक घडामोडींचा सखोल अभ्यास करून वैचारिक आणि प्रबोधनात्मक दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. या अंकांना सातत्याने पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेषतः मागील वर्षी प्रकाशित झालेल्या ‘सिंदूर’ दिवाळी अंकाला दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
यंदाच्या ‘तिसरं महायुद्ध?’ या दिवाळी विशेषांकातून सध्या संपूर्ण जगावर असलेल्या संभाव्य महायुद्धाच्या सावटाचा वेध घेण्यात आला आहे. उद्या तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचे जागतिक स्तरावर कोणते परिणाम होतील, मानवजातीसमोर कोणती संकटे उभी राहतील आणि अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जगाने कोणती तयारी करावी, यावर विविध लेखकांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. हा अंक वाचकांना निश्चितच विचार करायला लावेल, असा विश्वास संपादक बाळकृष्ण कासार यांनी व्यक्त केला.
बदलत्या काळानुसार वृत्तपत्राबरोबरच प्रिंट आणि डिजिटल मीडिया, यूट्यूब चॅनल, कुटुंब, पोर्टल आदी माध्यमांतून लोकनिर्माणचा वाचकवर्ग आणि संपर्कक्षेत्र विस्तारत आहे. नव्या पिढीतील तरुण-तरुणींना पत्रकारितेत करिअर करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध असून, नव्या प्रतिनिधींनी या संधीचे सोने करावे. पत्रकारिता ही केवळ व्यवसायाची संधी नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे मार्गदर्शनही संपादकांनी यावेळी केले.
यानंतर लोकनिर्माण वृत्तपत्राला सामाजिक कार्याच्या माध्यमातून बळ देणाऱ्या ‘लोकनिर्माण प्रतिष्ठान’ या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सभेची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांची संख्या वाढविणे तसेच आगामी काळात नवीन सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्यास संपादक बाळकृष्ण कासार, सहसंपादक युयुत्सु आर्ते, सत्यवान विचारे, प्रमोद आंब्रे, डॉ. नवनीत खरे, सुविधा कासार, जान्हवी टक्के, पुनम खरे, वैदेही सावंत, संजय गोरीवले आणि यशवंत गोरीवले उपस्थित होते.
प्रतिनिधींच्या सहभागातून प्रकाशन, वैचारिक लेखनातून समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्यातून जनसेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लोकनिर्माणची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top