ताज्या बातम्या

‘आनंदाची ओंजळ’ उपक्रमातून २८३ विद्यार्थ्यांची दिवाळी गोड! मातोश्री विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

मुंबई : समाजातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द येथील ‘माजी विद्यार्थी संघा’च्या वतीने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘आनंदाची ओंजळ’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या माध्यमिक विभागातील तब्बल २८३ विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाच्या साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री. समाधान कदम यांनी मांडली. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती करुणाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या सामाजिक उपक्रमाला मातोश्री विद्यामंदिरच्या दानशूर माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरघोस आर्थिक व वस्तुरूप मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणे शक्य झाले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. समाधान कदम व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. सुशील मेस्त्री यांनी कृतज्ञतापत्र देऊन आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपणारा ‘आनंदाची ओंजळ’ हा उपक्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे आणि सेवाभावी वृत्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

Scroll to Top