ताज्या बातम्या

साताऱ्यात न्यायालयीन सेवानिवृत्ती व कर्मचाऱ्यांच बेमुदत संप….

सातारा(अजित जगताप ) :‘समान काम, समान वेतन’च्या मागणीसाठी राज्यव्यापी संप सुरू असून सातारा जिल्हा व कौटुंबिक न्यायालयीन कर्मचारी यांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलन सुरू करून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या अनेकांची निराशा झाली. तारीख पे तारीख घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले.
‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच कनिष्ठ न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या प्रलंबित मागणीसाठी राज्यातील कनिष्ठ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक १७ नोव्हेबर रोजी शासन दुर्लक्षामुळे राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला. या आंदोलनाला सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी याबाबत संघटनेची चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनांनी यापूर्वी १६ सप्टेंबर २०२६ रोजी तसेच १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी काळ्या फिती लावून शांततामय मार्गाने आंदोलन केले होते. एवढेच नव्हे, तर १७ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त न्यायिक कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले.
२२ महिने उलटले, तरी शासनाचा निर्णय झाला नाही.
या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीचा परिपूर्ण प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, तब्बल २२ महिने उलटूनही शासनाकडून या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात झाला नाही. आज सातारा येथील कौटुंबिक न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दुपारचे भोजन सुद्धा आंदोलन स्थळी करताना दिवाळीच्या फराळाचेही वाटप झाले. सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाने सोडवण्यास पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल. असेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
————————————————
फोटो- सातारा कौटुंबिक न्यायालय व जिल्हा न्यायालयात आंदोलन करणारे सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top