कराड(प्रताप भणगे) : महाराष्ट्राच्या मातीत उभ्या असलेल्या कराड–तासवडे महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर मराठी भाषेलाच हद्दपार करण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती देण्यात आली आहे; मात्र महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीचा साधा उल्लेखही नाही.
फलकावर “शुल्क प्लाझा आगे” आणि “Fee Plaza Ahead – 1 Km” असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. मात्र “शुल्क प्लाझा पुढे – १ किमी” अशी मराठीतील माहिती कुठेच दिसत नाही.
महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी लावण्यात आलेल्या फलकावरच मराठीला डावलले जात असेल, तर मराठी भाषेचा सन्मान नेमका कुठे आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
हिंदी आणि इंग्रजीला जागा, मग मराठीला का नाही? महाराष्ट्राच्या महामार्गावर मराठी भाषेचा वापर करण्यास प्रशासनाला अडचण काय, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
मराठी भाषिकांच्या भावनांचा विचार करून संबंधित यंत्रणेने तातडीने फलकावर मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




