ताज्या बातम्या

कराड दक्षिणमधील दुष्काळी परिस्थितीची आ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून पाहणी

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची तसेच पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मनव, साळशिरंबे, महारूगडेवाडी, बोत्रेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, टाळगाव आणि घोगाव या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराड दक्षिणमधील दुष्काळ परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच कराड तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करावा यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, दूरध्वनीवरुनही संवाद साधला आहे. यंदाच्या हंगामात भुईमूग, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कराड तालुक्यात ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागांचा दुष्काळ परिस्थितीच्या निकषांत समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि नुकसानग्रस्त पिकांचे योग्य सर्वेक्षण होऊन शासनाच्या मदतीचा लाभमिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पंकज पाटील, प्रविण साळुंखे, निळकंठ शेडगे, तानाजी चवरे, धोंडीराम चोरगे, मच्छिन्द्र साळुंखे, जयवंत शेवाळे, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, दादासो शेवाळे, संताजी शेवाळे, अशोक पाटील, जयसिंग जाधव, सागर जाधव, रविंद्र सपकाळ, निवास शेवाळे, संदीप भावके, दिलीप सूर्यवंशी, निवास जाधव, सचिन बागट, हंबीराव पाटील यांच्यासह उंडाळे मंडल कृषी अधिकारी सपना देव्हारे, उपकृषी अधिकारी विशाल जगदाळे, बाबा तोरणे, अश्विनी कुबडे, रोहित शिगावकर आदी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट: शेतकऱ्यांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू. पाण्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पीक नियोजनाबाबतही संबंधित विभागांसोबत चर्चा करण्यात येईल.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

Scroll to Top