ताज्या बातम्या

अंबवड्यात ४३ किल्ले प्रतिकृतीने शिवकालीन इतिहास उलगडला…

परळी,सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा हे छत्रपतींची राजधानी आहे. याच राजधानी नजीक असलेल्या सातारा तालुक्यातील परळी भागातील अंबवडे गावाने शिवकालीन किल्ले व त्यांचा इतिहास उभारल्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या कल्पकता आणि पराक्रमालाच अंबवडे गावातील मावळ्यांनी मुजरा केला आहे. शिवकालीन इतिहास काही क्षणासाठी उलगडला आहे.
या किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी थेट कोल्हापूर- पुणे- सांगली- सातारा- आणि कोकणामधून शिवप्रेमी पर्यटक अंबवडे गावाला भेट देत आहे. त्यांचे ग्रामस्थ आपुलकीने स्वागत करत आहेत.
या ठिकाणी अर्धा ते एक गुंठ्यामध्ये उभारण्यात आलेल्या लिंगाणा,रायगड,
हरीहर,सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,रसाळगड,सिंहगड,
हरीहरेश्वर,संतोषगड,दतिगड,कलावंतीण दुर्ग,दातेगड,पद्मदुर्ग,भूषणगड,कोरीगड,
विशालगड,वासोटा,धनगड,
जीवधन,घोडपगड,वर्धनगड,सज्जनगड,पुरंदर, प्रतापगड,कोरीगड,पावनखिंड,जंजीरा,प्रतापगड
अजिंक्यतारा अशा किल्ल्याची प्रतिकृती बाल व तरुण मावळ्यांनी तयार करून दाखवली आहे.
काही वर्षांपूर्वी किल्ला तयार करून सादिक पातळीवर उत्कृष्ट किल्ला स्पर्धा घेण्याची मानवा फाउंडेशन, अंबवडे येथील शिवप्रेमी राजेश व्यंकट जाधव यांनी सुरुवात केली होती. आज अंबवडे गाव हे किल्ल्याचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे. किल्ले स्पर्धेसाठी दिवाळीच्या सुट्टीतच जोरदार तयारीला सुरुवात होते. सध्या ४३ किल्ले प्रतिकृती उभारली आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत किल्ले पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
सध्या भोंदवडे , परळी, सोनवडी, गजवडी डबेवाडी, अंबवडे खुर्द, अंबवडे बुद्रुक या गावातील लहान चिमुकल्या पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी किल्ले तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यानिमित्त किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या प्रचंड पावसातही किल्ले उभारून त्यावर ताडपत्री लावण्यात आली होती. सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले व मानवा फाउंडेशनचे राजेश व्यंकट जाधव यांच्या समवेत अंबवडे गावातील तरुण वर्ग येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शन करत आहेत.
कोणतेही ठिकाणी भाविक किंवा पर्यटक यांची गर्दी वाढली की, त्या ठिकाणी मार्केटिंग सुरू होते. पार्किंगच्या समस्या भेडसावतात. अंबवडे गाव सुद्धा यासाठी अपवाद नाही. सध्या रस्त्यावरच खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारल्यामुळे अनेक ठिकाणी अडथळे तसेच खाजगी पार्किंग व्यवस्था सुरुवात झाली आहे. भविष्यामध्ये अंबवडे ग्रामस्थांच्या दारातील जागा भाडेपट्ट्यावर घेऊन अनेक जण व्यवसाय उभे करतील. त्यानंतर खेळणे, पाळणा, मनोरंजनाचे साहित्य व जत्रा भरली जाण्याची काही पर्यटकांनी बोलून दाखवले आहे.
सध्या निशुल्क सेवा असली तरी भविष्यात गावच्या उत्पन्नाची वाढ करण्यासाठी शुल्क आकारणी झाल्यास नवल वाटणार नाही. कारण मार्केटिंग आले की, व्यवसाय वाढीसोबतच शुल्क वसूल करण्यासाठी अनेक जण सरसावतील. हा नैसर्गिक नियम आहे. अन्यथा या ठिकाणी हिंदुत्ववादी व शिवप्रेमी महायुतीने प्रत्येक किल्ल्याला अनुदान दिले पाहिजे अशी मागणी सेवानिवृत्त वनाधिकारी व पर्यटक चंद्रकांत दादा कांबळे यांनी केली आहे. त्यामुळे मोठ्या जोमात अधिक व्यापक प्रमाणात शिवरायांच्या कारकिर्दीतील घडामोडी पाहण्यास मिळणार आहे. बलशाली आरमार पाहण्यास मिळत असून युद्धनौके सोबतच नऊ जहाजांची प्रतिकृती आकर्षित करत आहेत. खटाव तालुक्यातील कुमार गुरव यांच्या संकल्पनेतून हे जहाजाचे प्रदर्शन भरले आहे. ते पाहण्यासाठी ही गर्दी होत आहे.
या चिमुकल्यांच्या कार्याला मनापासून दाद देण्यासाठी अभिप्राय व शक्य झाले तर शैक्षणिक साहित्य सुद्धा आणि देणगी देण्यास दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. असे काही पर्यटकांनी सुचवले आहे. त्याचाही विचार व्हावा. अशी अपेक्षा आहे . ………………………….

चौकट- अंबवडे येथे किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी लोक येतात. काही ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत लावल्यामुळे माहिती देणाऱ्या चिमुकल्यांकडून किल्ल्याची माहिती ऐकू येत नाही. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग आणि खाद्यपदार्थाच्या स्टॉलमुळे रस्त्यावरून चालत जाताना अडथळे निर्माण होतात. याबाबत निश्चितच सुधारणा करणे. अत्यंत आवश्यक आहे. असे काही पर्यटकांनी सांगितले.

Scroll to Top