ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांच्या ढेबेवाडीत डायलिसिस सेवा बंद, गैरसोयीने रुग्ण त्रस्त

पाटण(अजित जगताप) : महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना धरणानजीक पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील डायलिसिस सुविधा बंद झाल्याने किडनी रुग्ण गैरसोयीने त्रस्त झाली आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील ढेबेवाडीतील मोफत डायलिसिस सेवा त्वरित सुरू करावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्रात शासनाच्या ‘महाडायलिसीस’ योजनेअंतर्गत चालणारी मोफत डायलिसिस सेवा निधीअभावी बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. महायुतीच्या महाराष्ट्र शासनाकडे संबंधित कंत्राटदार कंपनीची कोट्यवधी रुपयांची देयके थकले आहे. अनेक ग्रामीण रुग्णालयांमधील मोफत डायलिसिस केंद्रे तात्पुरती बंद झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस युनिट बंद झाले आहे. डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
पर्यायी व्यवस्था म्हणून पाटण तालुक्यातील अनेकांना तातडीच्या डायलिसिस उपचारांसाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालय , पाटण ग्रामीण रुग्णालय येथे तसेच साताऱ्यातील आयुष्यमान भारत संलग्न खाजगी केंद्रांचा आधार घ्यावा लागला आहे. या ठिकाणी डायलेसिस रुग्णांची संख्या वाढल्यामुळे अनेकांना डायलिसिससाठी वाट पहावी लागत आहे.
डायलिसिससाठी अत्यंत शुद्ध पाण्याची गरज असते. ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा बंद झाल्याने इतर ठिकाणी
डायलिसिस उपचार करण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागतात. ढेबेवाडी परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आता तातडीने डायलिसिस साठी इतर ठिकाणी प्रवास सुद्धा करावा लागत आहे.
डायलिसिस रुग्णांची इतर ठिकाणी संख्या वाढल्याने पेशंट मॉनिटर ,ऑक्सिजन सिलेंडर, सक्शन मशीन आणि डिफिब्रिलेटर सज्ज ठेवले जात आहेत. संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णासाठी नवीन आणि निर्जंतुक साहित्य काही वेळेला बाहेरून आणावी लागत आहेत.
वैद्यकीय कारणांसाठी ब्लड ट्युबिंग सेट,
फिस्टुला सुया आणि कॅथेटर , डायलिसेट सोल्यूशन, हेपरिन औषध आणि नळ्या स्वच्छ ठेवण्यासाठी सलाईन वापरले जाते.
सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सामान्य रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , कराड. वाई, फलटण, वडूज, आणि म्हसवड येथील शासकीय रुग्णालयांतही डायलिसिस सुविधा सुरू आहे. शासकीय रुग्णालयांव्यतिरिक्त सातारा, कराड, फलटण आणि वाई येथील अनेक खाजगी रुग्णालये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत संलग्न आहेत, जिथे शासकीय योजनेतून मोफत उपचार केले जातात.
साधारणपणे १५० रुपये ते ५०० रुपये प्रति डायलिसिस सत्र खर्च येतो. आता ढेबेवाडी परिसरातील डायलिसिस सुविधा बंद असल्याने इतर ठिकाणी जाण्यासाठी रुग्णांना हजार ते दीड हजार खर्च येत आहे. त्या ठिकाणी
काही विशिष्ट इंजेक्शन्स (उदा. रक्तवाढीचे इंजेक्शन) किंवा नवीन डायलायझर फिल्टर बाहेरून आणावा लागल्यास त्याचा खर्च रुग्णाला करावा लागत आहे . या सर्व गोष्टींचा विचार करून सत्ताधारी नेते व कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाली करून ढेबेवाडीतील डायलिसिस यंत्रणा कार्यान्वित करून रुग्णांना दिलासा द्यावा.
कारण, पूर्वी सातारा जिल्ह्यात एक मंत्री असताना आरोग्याची सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत होती. आता चार मंत्री असल्याने चारपट सुविधा बंद पडत आहेत. अशीच सामान्यांची धारणा झाली आहे. दरम्यान, गरिबांच्या झोपडी- वस्तीवर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करण्यापेक्षा मंत्री महोदयांनी मानवता भावनेतून गरीब व शेतकरी कुटुंबातील डायलिसिस वरील रुग्णांना सेवा देण्यात धन्यता मानावी. यासाठी सातारा जिल्ह्यातील डायलेसिस रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी विनंती केली आहे.

Scroll to Top