मुंबई : संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त दादर येथे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे सोळावे वर्ष असून, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
मुंबईत नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त व्यस्त असलेल्या आणि पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांना मुंबईतच भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या नामस्मरणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. गेली पंधरा वर्षे ही परंपरा उत्साहात सुरू असून, यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बँड-पथक, विठ्ठल नामाचा जयघोष आणि जागोजागी काढण्यात येणाऱ्या आकर्षक रांगोळ्या हे विशेष आकर्षण असणार आहे. दादर फुल मार्केट येथून सुरू होणारी ही दिंडी सेनापती बापट मार्ग, दादर फुल मार्केट परिसर, रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, एन.सी.केळकर रोड, रानडे रोड मार्गे डी. एल. वैद्य रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहोचणार असून, तेथे दिंडी सोहळ्याची सांगता होईल.
दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेल परिसरात होणारा रिंगण सोहळा हे या दिंडीचे विशेष आकर्षण असते. या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार व प्रसादाचे वाटपही करण्यात येते.
या सोहळ्यामध्ये दादर फुल मार्केटमधील व्यापारी, फुलविक्रेते, वारकरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होतात. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम असलेला हा दिंडी सोहळा दरवर्षी दादरकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
या भक्तिमय सोहळ्यात सर्व विठ्ठलभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्तिकी एकादशीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.




