ताज्या बातम्या

साहित्य-कला प्रतिष्ठान, महाराष्ट्रची स्थापना; अध्यक्षपदी सायमन मार्टिन

मुंबई : साहित्य आणि विविध कलाक्षेत्रांत दर्जेदार सांस्कृतिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ‘साहित्य-कला प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. दादर येथे आयोजित विशेष बैठकीत संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा २७ व्या अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सायमन मार्टिन यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी व स्तंभलेखक अजय कांडर, तर प्रमुख कार्यवाहपदी नाट्यलेखक व दिग्दर्शक उदय जाधव यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी मधुकर मातोंडकर, सहकार्यवाहपदी डॉ. निर्मोही फडके, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रूपाली कुटे, गोपाळ रायबोले आणि स्वप्निल जाधव यांचा समावेश आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहून निष्ठेने साहित्य, नाटक, चित्रपट व अन्य कलाक्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणी कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचा सन्मान करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
२०२६-२७ या वर्षात साहित्य, नाटक, चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारांची घोषणा पुढील पंधरा दिवसांत केली जाणार असून वर्षभर विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Scroll to Top