मुरबाड (ठाणे) : रत्नागिरी जिल्ह्याची कन्या आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कु. जान्हवी अर्जुन टक्के यांना मुरबाड येथे आगरी समाजाच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘आगरी समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थी गुणगौरव सोहळा व आगरी समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
दादा ताई फाउंडेशन, ठाणे यांच्या माध्यमातून जान्हवी टक्के यांनी मुरबाड तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले आहेत. बालविवाह रोखणे, बालविवाहाच्या संकटात सापडलेल्या मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणे, असे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुरबाड तालुक्यातील दोन मुलींनी शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणानंतर नोकरी मिळवत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.
याशिवाय मुरबाड तालुक्यातील आदिवासी, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. मुंबईतील केईएम हॉस्पिटल, सोमय्या हॉस्पिटल तसेच रायगड हॉस्पिटल, भिवपुरी-कर्जत यांसारख्या आरोग्य संस्थांशी समन्वय साधून त्या गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करतात. त्यांच्या या रुग्णसेवेमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
विशेष म्हणजे, त्यांचे सामाजिक कार्य केवळ कोकण किंवा मुरबाडपुरते मर्यादित नसून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मदतीची हाक आल्यास शक्य ते सहकार्य करण्यासाठी त्या तत्पर असतात.
या सोहळ्यात आगरी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रदीप राजाराम साळवी यांनी जान्हवी टक्के यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. स्वतःचे शिक्षण आणि करिअर सांभाळत कमी वयात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या जान्हवी या तरुणींसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रमाशी युवकांनी कशा प्रकारे जोडले जावे, याबाबत जान्हवी यांनी दिलेल्या माहितीचेही साळवी यांनी कौतुक केले.
“रत्नागिरी जिल्ह्याची ही कन्या आज संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. समाजातील गरजू व्यक्ती, महिला, मुली आणि विद्यार्थ्यांसाठी तिचे कार्य असेच निरंतर सुरू राहो. तिच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी संपूर्ण मुरबाडकर आणि कोकणवासीयांच्या शुभेच्छा व आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी आहेत,” अशा भावना प्रदीप राजाराम साळवी यांनी व्यक्त केल्या.
जान्हवी टक्के यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या योगदानाची पावती ठरला आहे. कोकणच्या मातीतून पुढे आलेली ही तरुण सामाजिक कार्यकर्ती शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण करीत आहे.
मुरबाड येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व आगरी समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात कु. जान्हवी अर्जुन टक्के यांचा सन्मान करताना आगरी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




