ताज्या बातम्या

साताऱ्यात जी.के.एस.महाविद्यालयाचा क्रिकेटमध्ये दणदणीत विजय महाविद्यालयची प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय स्तरावर निवड

मुंबई (शांताराम गुडेकर ) : मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सातारा येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला असून संघाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र स्कूल गेम अँड ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने श्रीमंत छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले विद्यालय, शेंद्रे, सातारा येथे कबड्डी व क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जी.के.एस. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला. खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सांघिक भावना यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.
या यशस्वी संघामध्ये कु. प्रणय सपाट, कु. भाविक पाटील, कु. दक्ष जी. पाटील, कु. दक्ष एस. पाटील, कु. ओम काटकरी, कु. श्रीधर कोतवाल, कु. अनिकेत ठाकरे, कु. भाविक शेलार आणि कु. यश माळी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.बाळाराम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मेहनतीला मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
महाविद्यालयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या संचालिका प्रा.(सौ.)कविता शिकतोडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भास्कर जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर आणि उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडेल यांनी सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक श्री. बाळाराम चौधरी यांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून यशस्वी संघाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Scroll to Top