ताज्या बातम्या

कराडात गाडी अडवून दोन हजारांची खंडणी मागितली; पैसे न दिल्याने मारहाण करून कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : वाहन अडवून दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्याने वाहनचालकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. १२) येथील कोल्हापूर नाका परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर नाका परिसरातील सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर अंबारी हॉटेलसमोर फिर्यादी इरफान सय्यद हे आपल्या गाडीत प्रवासी भरत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी आडवी मारून दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी जबरदस्तीने वाहनाची चावी काढून घेतली. तसेच त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

दरम्यान, फिर्यादीने पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने त्यांना गुप्त भागावर लाथा मारून मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्यानेही मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपी आशिष ऊर्फ बाळू कुर्ले याने कुऱ्हाडीने फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. मात्र, फिर्यादीने तो वार चुकविल्याने अनर्थ टळला.

याप्रकरणी फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आशिष ऊर्फ बाळू अरुण कुर्ले (वय २९), इरफान बहुद्दीन सय्यद (वय ३४), अविनाश विकास गोतपागर (वय ३२) आणि सौरभ शंकर करांडे (वय ३०) या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. खंडणी मागून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील पाचवा आरोपी योगेश अरुण कुर्ले (रा. शनिवार पेठ, कराड) हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Scroll to Top