ताज्या बातम्या

इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) : इंडियन बँकेच्या कराड शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एकाने आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड) येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रविकिरण केशव लाडे (मूळ रा. मुरुड ता. जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी रविकिरण यांचे भाऊ अक्षय केशव लाडे (वय ३२) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय लाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत बँकेचे उपक्षेत्रीय अधिकारी मैथेली शरण सावला आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांच्याकडून रविकिरण यांना कथितरीत्या मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांना सुट्टी दिली जात नव्हती, बैठकांमध्ये, तसेच इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली जात होती. कार्यालयीन उद्दिष्टे पूर्ण करूनही त्यांना वारंवार अपमानास्पद बोलणे ऐकावे लागत होते. विनाकारण मानसिक त्रास दिला जात असल्याने ते तणावाखाली होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या कथित जाचाला कंटाळूनच रविकिरण यांनी राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप अक्षय लाडे यांनी केला आहे. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Scroll to Top