ताज्या बातम्या

उंडाळे जलाशयातील शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी अतुलबाबा भोसले मैदानात!

कराड : दुष्काळी परिस्थिती, शेतीपंपांचा बंद असलेला वीजपुरवठा आणि पाण्याअभावी धोक्यात आलेली पिके अशा दुहेरी संकटात सापडलेल्या उंडाळे जलाशय परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आता लोकप्रतिनिधींच्या स्तरावर आवाज मिळाला आहे. मौजे उंडाळे (ता. कराड) येथील जलाशयाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा आठवड्यातून किमान एक दिवस सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांची शेतकरी प्रतिनिधींनी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना, शिवनगर येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर झालेल्या चर्चेत अतुलबाबांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच योग्य उपाययोजना करण्याचा शब्द दिला.

पाणी उपलब्ध, पण वीज नसल्याने शेती तहानलेली!

उंडाळे जलाशय परिसरातील शेतकरी शेतीसाठी जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने जलाशयातील उपलब्ध पाण्याचा वापर करूनही शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही. एकीकडे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे, तर दुसरीकडे ऊस पिकाला वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक धोक्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा आणि आर्थिक नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला असून, वीजपुरवठा बंद राहिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे कोणतीही अवास्तव मागणी न करता आठवड्यातून केवळ एक दिवस शेतीपंपांसाठी वीजपुरवठा सुरू ठेवण्याची रास्त मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची एकमुखी मागणी; अतुलबाबांकडून सकारात्मक प्रतिसाद!

या प्रश्नाचे गांभीर्य आमदार अतुलबाबा भोसले यांच्या निदर्शनास आणून देताना शेतकरी प्रतिनिधींनी जलाशय परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण आणि रब्बी व ऊस पिकांचे संभाव्य नुकसान याबाबत सविस्तर माहिती दिली. आठवड्यातून किमान एक दिवस नियमित वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पिके वाचविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार अतुलबाबा भोसले यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. या प्रश्नावर लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीजपुरवठ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उंडाळे जलाशय परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

शेतकऱ्यांची मागणी केवळ वीजपुरवठ्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या उभ्या पिकांच्या अस्तित्वाची आणि कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याची आहे. वेळेत वीजपुरवठा सुरू झाल्यास रब्बी हंगामातील पिकांसह ऊस पिकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे या मागणीवर तातडीने निर्णय होऊन महावितरण प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

या निवेदनप्रसंगी श्री.पंकज पाटील (साळशिरंबे), श्री.धनंजय देशमुख (टाळगाव), श्री.सागर जाधव (टाळगाव), श्री.हंबीरराव पाटील (नांदगाव), श्री.दादासो शेवाळे (मनव) श्री.जयवंतराव यादव (साळशिरंबे), श्री.अशोकराव पाटील (उंडाळे), श्री.संताजी शेवाळे (मनव) श्री.अक्षय शेटे (येळगाव), श्री.विलास चवरे (साळशिरंबे), श्री.पंडित थोरात (साळशिरंबे), श्री.कुमार पाटील (नांदगाव) श्री.संग्राम शेटे (येळगाव) यांच्यासह उंडाळे जलाशयाचे मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

आता आश्वासनाचे प्रत्यक्ष निर्णयात रूपांतर होण्याची प्रतीक्षा!

उंडाळे जलाशय परिसरातील शेतकऱ्यांनी एकजुटीने उपस्थित राहून आपल्या न्याय्य मागणीचा बुलंद आवाज लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविला आहे. आमदार अतुलबाबा भोसले यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. आता संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आठवड्यातून किमान एक दिवस वीजपुरवठा सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा उंडाळे जलाशय परिसरातील समस्त लाभधारक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top