कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) :धोंडेवाडी (ता. कराड) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर मारामारीची घटना घडली. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, असून, मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेले डीजे, बँड जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरूवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे सुमारे नऊच्या सुमारास धोंडेवाडी गावात नवभारत गणेश मंडळ आणि धनराज गणेश मंडळाच्या मिरवणुका बिरोबा मंदिर चौकात आल्या होत्या. यावेळी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याने गाणी लावण्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर एका मंडळाच्या सदस्यांनी फटाक्यांची माळ दुसऱ्या मंडळाच्या मिरवणुकीजवळ लावल्याने वाद अधिक चिघळला आणि दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली.
या घटनेनंतर नवभारत मंडळाने लावलेला डीजे बंद करण्यासाठी संबंधित चालकाला सूचना करण्यात आल्या. तसेच धनराज गणेश मंडळाचा बँड बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी हे निर्देश न पाळता मिरवणूक सुरू ठेवली. त्यामुळे कार्यकर्ते आणि बॅड कामगार यांच्या मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने कृत्य केल्याप्रकरणी एकूण १६ जणांविरुद्ध कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली. अनुषंगाने दोन्ही मंडळांनी मिरवणुकीसाठी वापरलेले डीजे, बँड जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षीकार पाटील, पोलिस हवालदार शशिकांत काळे, तानाजी बागल, अर्जुन पाचुपते, शरद चव्हाण, आकर्षण फडतरे आणि उमेश गुरव यांनी केली.




