ताज्या बातम्या

स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्काराचे 28 सप्टेंबर रोजी आयोजन

तळमावले/वार्ताहर : स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.28 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता मु.डाकेवाडी पो. काळगांव, ता.पाटण, जि.सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला महंत अहिल्यागिरीजी महाराज (शिवदत्त मठ, कापसेवाडी), संभाजीराव पाटणकर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), प्रदीप कांबळे (वक्ते/लेखक/कवी), डॉ.राजेंद्र कंटक (गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर), विशाल पाटील (सातारा जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 18 मराठी), अमित देशममुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड पूर्व उपविभाग), सानिका माने (इन्स्टाग्राम रील्स स्टार) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि साहित्यिकांना सन्मानित केले जाणार असून, यावर्षीचा प्रथम वर्षाचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) सामाजिक कृतज्ञता पुरस्कार शिवसमर्थ समूहाचे कुटुंबप्रमुख ॲड.जनार्दन बोत्रे यांना जाहीर झाला आहे. तसेच, न्यू इंग्लिश स्कूल काळगांव मध्ये 2025 सालच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेत मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु.सिद्धी विकास काळे हिला एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र व तात्या पुस्तक असे स्वरूप असलेले स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारांच्या चौथ्या वर्षासाठी राज्यभरातील 17 साहित्यिकांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रदीप बडदे (माणुसकीची अत्यंयात्रा), अमृता खंडेराव (उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी), डॉ.शिवाजी शिंदे (भावगंधित व्यक्तिमत्त्वे), सदाशिव बर्गे (शंभरची चिल्लर), तुकाराम कांबळे (बिंब-प्रतिबिंब), प्रकाश संकपाळ (कुडपाण), वीणा रारावीकर (यू हॅपिअर), सत्यवान मंडलिक (इथे जन्मली माणुसकी), सौ.सुमन चंद्रशेखर (मायेची पाखर), डॉ.शुभांगी कुंभार (विचारदीप निबंधमाला), प्रा.पौर्णिमा केरकर (गोमंतकीय लोकसाहित्य), चुडाराम बल्हारपुरे (जत्रा घडली नागोबाची), डॉ. स्वाती पाटील (निळी निळी नव्हाळी), रामभाऊ डुबल (रामभाऊंच्या चारोळ्या), वसुंधरा निकम (अक्षरपुष्प), सौ. कांता भोसले (रानफूल) आणि गणेश बर्गे (लाल दिवा) या पुस्तकांचा व लेखकांचा समावेश आहे.
यंदापासून सुरू करण्यात आलेला प्रथम वर्षाचा स्व.राजाराम डाकवे तात्या स्मृती सर्वोत्कृष्ट वाचनालय पुरस्कार सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय आणि मालदन येथील युवा साहित्य समाज वाचनालय यांना दिला जाणार आहे. यासोबतच तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धेमध्ये निखील पंडीतराव (सकाळ-संतुलित मन), डॉ.मधुकर केशव वर्तक (आनंद गंधाली), अमोल सरतांडेल (दर्यावर्दी) आणि संतोष सावंत भोसले (चंदगड टाईम्स्) हे विजेते ठरले आहेत. तर सातव्या सेल्फी विथ गुढी स्पर्धेत सौ.अपूर्वा पाटणकर (प्रथम), सई हर्षदा जयंत कदम (द्वितीय) आणि छाया दुर्योधन पारेकर (तृतीय) विजेत्या ठरल्या असून अनुपमा दाभाडे, कविता कचरे, सुनील पवार व माधुरी जाधव यांना विशेष प्रावीण्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तात्या पुस्तक असे असून या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी डाकवे परिवाराने गेली 7 वर्षापासून मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, साहित्य पुरस्कार, शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमात सहभागी, पुस्तक भेट अभियान, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, ग्रंथालयांना पुस्तके वितरण, पुस्तकांचं झाड, वार्तांकन स्पर्धा, एक अक्षरगणेशा संमेलनासाठी, स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, वाढदिवसादिवशी पुस्तक प्रकाशन, वृत्तपत्र विक्रेते सन्मान, स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून वाचकांना व्यासपीठ असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्याला समाजातूून उदंड प्रतिसादही मिळाला आहे.
भविष्यामध्ये वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने वृत्तपत्रलेखन, निबंध, चित्रकला, काव्य स्पर्धा, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा, मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, तात्याश्री साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी संमेलन, पुस्तक भेट अभियान असे विविध उपक्रम वाचनालयाच्या माध्यमातून राबवले जाणार असल्याचे मत संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.
चतुर्थ पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, संदीप डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

पुस्तके व साहित्यासाठी सहकार्याचे आवाहन, मदतदात्यांना ई-प्रमाणपत्र..!

स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालयाच्या उभारणीसाठी पुस्तके, वर्तमानपत्रे, संगणक, कपाटे व फर्निचर अशा भौतिक साहित्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी डाकवे परिवाराने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. या वाचन चळवळीत दानशूर व्यक्ती व संस्थांनी वस्तूरूपी किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे. मदत करणार्या सर्व सहकाऱ्याना स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मानपूर्वक ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुस्तके भेट देण्याचे आवाहन
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांनी व उपस्थितांनी येताना पुष्पगुच्छ किंवा इतर वस्तू आणण्याऐवजी शुभेच्छा म्हणून ग्रंथ व पुस्तके भेट स्वरूप घेऊन यावीत, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे. प्राप्त होणारी पुस्तके ग्रामीण भागातील स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालयास देऊन वाचन चळवळीस बळ देण्यात येणार आहे. वाचन संस्कृती जपण्याच्या या ज्ञानयज्ञात सर्वांनी आपले मोलाचे योगदान द्यावे.

Scroll to Top