ताज्या बातम्या

दादासाहेब फाळके चित्रनगरीने सुवर्णमहोत्सवी वर्षात केले पदार्पण

मुंबई, दि. २६ सप्टेंबर : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीने आपल्या गौरवशाली वाटचालीतील ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट देऊन विविध चित्रीकरण स्थळांची पाहणी केली.

यावेळी ॲड. आशिष शेलार यांनी चित्रनगरीतील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, उपअभियंता (स्थापत्य) विजय बापट आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

चित्रनगरीतील पायाभूत सुविधांचा विकास, चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा, विविध विकासकामे तसेच चित्रकर्मींसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि योजनांची माहिती त्यांनी घेतली. चित्रनगरीतील सुविधा अधिक आधुनिक, कार्यक्षम आणि चित्रपटसृष्टीच्या गरजांशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

चित्रनगरीच्या माध्यमातून चित्रपट, मालिका आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच विविध घटकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देतानाच, उपलब्ध सुविधांचा अधिक प्रभावी वापर, कार्यक्षमता वाढविणे आणि सुविधा अधिक किफायतशीर व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी चित्रनगरीतील विविध चित्रीकरण स्थळांना भेट देत येथील सुविधा आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने चित्रनगरीच्या विकासाची पुढील दिशा, नव्या योजना आणि विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

“दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ५० व्या वर्षात पदार्पणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या मुंबईतील, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील चित्रपट, मालिका, नवनिर्मितीचे मुख्य केंद्र असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीने यशस्वीरीत्या ५० व्या वर्षात वाटचाल सुरू केली आहे. हा आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. गेल्या ४९ वर्षांपासून या चित्रनगरीने लाखो हातांना रोजगार दिला, नवप्रतिभेला वाव दिला आणि कला, कौशल्य व सर्जनशीलतेचे एक विशाल व्यासपीठ उभारले आहे,” असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली चित्रनगरीला एक नवे, जागतिक रूप देण्याचा आमचा मानस आहे. माध्यम आणि मनोरंजनाचे हे केंद्र भविष्यात अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अत्याधुनिक व्हावे, यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

चित्रनगरीचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ १ ऑक्टोबर रोजी होणार!

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स्टुडिओ क्रमांक १, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई येथे होणार आहे.

Scroll to Top