ताज्या बातम्या

कारेगाव भूषण’ पुरस्काराने ॲड. संग्राम शेवाळे यांचा सन्मान

कारेगाव :

श्री संत दिनकर दादा नवले महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जनता दलाचे युवा नेते, महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सदस्य तथा कारेगाव शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांना ‘कारेगाव भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक तसेच तरुणाईच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी केलेला हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. आपल्या गावातीलच व्यक्तीला ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिळालेला हा सन्मान सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरला.
सन्मानाला उत्तर देताना ॲड. संग्राम शेवाळे म्हणाले, “माझ्या मातीने, माझ्या गावाने आणि माझ्या माणसांनी दिलेला ‘कारेगाव भूषण’ हा सन्मान माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक, आनंदाचा आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे.”
“शैक्षणिक, सामाजिक आणि तरुणाईच्या प्रश्नांसाठी माझ्या परीने केलेल्या कामाची दखल घेऊन आपल्या गावाने आणि आपल्या माणसांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझ्या पुढील वाटचालीची प्रेरणा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या सन्मानाबद्दल त्यांनी कारेगावातील ज्येष्ठ मंडळी, माता-भगिनी, युवक, ग्रामस्थ, आयोजक, सप्ताह समिती तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Scroll to Top