कराड : कराड नगरपालिका हद्दीतील मुस्लिम ईदगाह कमिटीच्या अखत्यारित असलेल्या ईदगाहजवळील पाऊलवाटेवर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा सामाजिक कार्यकर्ते मा. सिराज मुल्ला तसेच त्यांचे सहकारी जावेद पटवेकर आणि बाबू शिंदे यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने एकत्र करून परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमासाठी NAHPAचे महाराष्ट्र राज्य महासचिव तथा आयुर्वेदिक व निसर्गोपचार तज्ज्ञ मा. जावेद एन. मोदी यांचे मार्गदर्शन लाभले.
ईदगाह परिसरातील पाऊलवाटेवर वारंवार कचरा टाकला जात असल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या परिसरातून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक ये-जा करतात. कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे लहान मुले व मुलींना या मार्गावरून जाताना भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती व निधी खर्च केला जात असताना, तसेच नगरपालिका प्रशासनाकडून अनेक घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली असतानाही काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची प्रवृत्ती कायम असल्याबद्दल NAHPAच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ईदगाह व कब्रस्थान कमिटी तसेच कराड नगरपालिका प्रशासनाने या परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी NAHPAच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे. तसेच संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता, कचरा टाकण्यास प्रतिबंध करणारे फलक आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते, नगरसेवक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही NAHPAच्या सदस्यांनी केले आहे.
सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता नगरपालिका प्रशासनाच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




